यह पब्लिक है…यह सब जानती है
भगवान इन्सान को धरती पर भेजना हो तो उसके दो वक्त की रोटी का इंतजाम करके भेजना….
हाऊसफुल्ल गर्दीत खचाखच भरलेल्या थिएटरात पब्लिकच्या प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या.
जिस रोटी के लिए लड रहे है उसी को मिट्टी मे रख दिया… पुन्हा टाळ्या
ऐसा कोई फंदा नही बना जो मेरे गले मे फिट हो सके…
मनमोहन देसाई दिग्दर्शित “रोटी” (Roti)च्या प्रत्येक डायलॉगवर (अर्थात संवादावर) पब्लिक फिदा होते. चित्रपट हे दृश्य माध्यम असले तरी आपल्या देशात ते बोलपट म्हणून जास्त रुजले ही वस्तुस्थिती. दोन कलाकार एकमेकांवर डायलॉगमधून कशी मात देतात यावर पूर्वीचे चित्रपट रसिक भरभरुन बोलत….तेही डायलॉगसह बोलत. bollywood tadka
“रोटी” (Roti) मुंबईत १८ ऑक्टोबर १९७४ रोजी प्रदर्शित झाला. चक्क पन्नास वर्ष पूर्ण झाली देखिल. मेन थिएटर शालिमारला फर्स्ट शोपासूनच पिक्चर पब्लिकला भारी वाटला. यात राजेश खन्ना व मुमताज जोडीची क्रेझ, आनंद बक्षी व लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीचे लोकप्रिय गीत संगीत व नृत्य, कादर खानचे टाळीबाज संवाद आणि या सगळ्याची मनमोहन देसाई यांनी केलेली मसालेदार मनोरंजक टेस्टी भेळ.
विशेष उल्लेखनीय गोष्ट, ११ ऑक्टोबर १९७४ रोजी मुंबईत शक्ती सामंता दिग्दर्शित “अजनबी” प्रदर्शित झाला (मुंबईत मेन थिएटर लिबर्टी) आणि पुढच्याच आठवड्यात “रोटी” (Roti). (मात्र दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश या वितरण क्षेत्रात हे दोन्ही चित्रपट मुंबई अगोदर रिलीज झाले. त्या काळात असेच टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत.) अजनबीपेक्षा रोटी जास्त यशस्वी ठरला. “रोटी”च्या यशाचे श्रेय संवाद, गीत संगीत व नृत्य यांना. चित्रपटाची गोष्ट मनमोहन देसाई यांच्या पत्नीची. त्यावर प्रयाग राज यांची पटकथा. ते मनजींचे हुकमी लेखक. (त्यात के. बी. पाठक, के. के. शुक्ला असे जोडत गेले).
मंगल (राजेश खन्ना) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा, तो पोलीस इन्स्पेक्टर सूरज (पिंचू कपूर)चा पाठलाग चुकवत धावत धावत असतानाच त्याच्या धक्क्याने श्रवण एक्स्प्रेस ट्रेनमधून पडतो. ती एक्स्प्रेस ट्रेन उत्तर भारतातील एका गावात पोहचते. तेथे मंगल नवीन आयुष्य सुरु करतो. बिजलीशी (मुमताज) परिचय वाढवून तिच्यासह शिक्षक बनतो. तेथे त्याची राहण्याची सोय एका वृद्ध आणि दुर्दैवाने अंध दाम्पत्य लालाजी (ओमप्रकाश) आणि मालती (निरुपा राॅय) यांच्या घरी होते. मंगलमुळेच अपघातात निधन झालेला श्रवण हा त्यांचाच मुलगा आहे हे मंगलला माहित नसते. मंगल गावातील जनतेचे मन जिंकतो, प्रेम जिंकतो. अखेरीस योगायोगानेच पोलीस इन्स्पेक्टर सूरज या गावात आल्यावर मंगलला पकडायचा प्रयत्न करतात….
मनमोहन देसाईंचा पिक्चर म्हणजे पिक्चरच्या सुरुवातीस टायटलला हरवणारे दोन वा तीन भाऊ हे पिक्चरच्या क्लायमॅक्सला एकमेकांना भेटणार हा हुकमी फाॅर्मुला. यात अनेक अतिशयोक्त प्रसंगाची मसालेदार मनोरंजक फोडणी. “रोटी”मध्ये वरकरणी गोष्ट वेगळी पण पिक्चरभर मसाला मनजी स्टाईल. पब्लिकलाही दोन घटका एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट एन्टरटेन्मेन्ट हवी असल्यानेच असे पिक्चर एकदम फिट्ट व हिट्ट.
गाणी एकदम झक्कास सपोर्ट सिस्टीम. नाच मेरी बुलबुल एक पैसा मिलेगा ( पार्श्वगायक किशोर कुमार), गोरे रंग पे ना इतना गुमान कर (लता मंगेशकर व किशोर कुमार), पब्लिक है यह सब जानती है (किशोर कुमार), यार हमारी बात सुनो (किशोर कुमार) ही गाणी आजही लोकप्रिय. आनंद बक्षी यांची गीते व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत हे कायमच मनोरंजक चित्रपटासाठी कायमच फाॅर्मात. (Roti)
यार हमारी बात सुनो या गाण्यातील जिसने पाप ना किया हो वो पापी न हो हे तत्वज्ञान बायबलमधील असे म्हटले जाते. पब्लिक है यह सब जानती है… हे समाजकारणापासून राजकारणापर्यंत सगळीकडेच अनेक संदर्भात हमखास आठवले जाते. पन्नास वर्षात पब्लिक अधिकाधिक चौकस, विचारी आणि जाणकार झाला आहे हे अनेक गोष्टींवर उपग्रह वाहिनीच्या कॅमेरासमोर पब्लिक ज्या आत्मविश्वासाने थेट रोखठोक बोलतेय यातून दिसतेय.
रोटीचे छायाचित्रणकार के. वैकुंठ तर संकलक कमलाकर कारखानीस. चित्रपट दाखवलाय छान नि वेगही गुंतवून ठेवणारा आहे. चित्रपटात सुजीत कुमार, असरानी, जीवन, जगदीप, जगदीश राज, विजू खोटे, पाहुणा जितेंद्र इत्यादी अनेक कलाकार छोट्या छोट्या भुमिकेत आहेत. राजेश खन्ना व मुमताज पब्लिकप्रिय जोडी.
नरेंद्र बेदी दिग्दर्शित बंधन, राज खोसला दिग्दर्शित दो रास्ते व प्रेम कहानी, मनमोहन देसाई दिग्दर्शित सच्चा झूठा व रोटी, दुलाल गुहा दिग्दर्शित दुश्मन, जे. ओम प्रकाश दिग्दर्शित आप की कसम, जम्बो दिग्दर्शित अपना देश, के. बालचंदर दिग्दर्शित आयना या चित्रपटात एकत्र आली. दो रास्ते सुपरहिट ठरताच यांना जणू जोडीने ऑफर आल्या. सचिन भौमिक दिग्दर्शित राजा रानी या चित्रपटात शर्मिला टागोर राजेश खन्नाची नायिका तरी पाहुणी कलाकार म्हणून मुमताज आहेच.
प्रेम कहानीची नायिका म्हणून मौशमी चटर्जीची निवड झाली, चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यातही तिने भाग घेतला. (सोशल मिडियात प्रेम कहानीच्या मुहूर्त दृश्यात मौशमी चटर्जी पाह्यला मिळते) तरी राजेश खन्नाच्या खास आग्रहाखातर मुमताजला राज खोसलानी मौशमीच्या जागी घेतले. आपल्याला मुमताज लकी म्हणून ती हवी असा राजेश खन्नाचा आग्रह. खरं तर ती हळूहळू चित्रपटसृष्टीतून बाहेर पडून लग्नाच्या तयारीत लागली होती. (त्या काळातील गाॅसिप्स मॅगझिनमधून मौशमी चटर्जीची या सगळ्यावरची आगपाखड फार गाजली) तर रोटीची पूर्वतयारी सुरु असतानाच डिंपल कापडियाने “बाॅबी” (मुंबईत रिलीज २८ सप्टेंबर १९७३) स्वीकारुन चित्रपटाची प्रगती होत असतानाच रोटीच्या नायिकेसाठी डिंपलचे नाव चर्चेत असल्याचे गाॅसिप्स गाजले…
=============
हे देखील वाचा : ती गाणे देखिल गायलीय….
=============
चित्रपटातील क्लायमॅक्सला बर्फाळ भागातून राजेश खन्ना मुमताजला खांद्यावर उचलून घेऊन चालत चालत जातो या एकाच दृश्याचे तब्बल आठ दिवस चित्रीकरण चालले… या चित्रपटात राजेश खन्नाने काही बदल सुचवल्याने मनमोहन देसाई यांच्याशी त्याचे बरेच खटके उडाल्याचेही गाजले….
पिक्चर सुपर हिट ठरले हे या सगळ्यात महत्वाचं. बाकी गोष्टी चित्रपट निर्मितीचाच एक भाग म्हणायचे. आशीर्वाद पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती “रोटी” (Roti)चे आणखीन एक विशेष….. राजेश खन्नाच्या सुपर स्टार झंझावातातील हा शेवटचा चित्रपट. (१९७५ च्या जानेवारीत २४ तारखेला यश चोप्रा दिग्दर्शित दीवार प्रदर्शित झाला आणि अमिताभ बच्चन नावाच्या पर्वाला गती आली. त्याची सुरुवात १९७३ च्या प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर व ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हरामने झालीच होती…..)
काही वर्षांनंतर राजेश खन्नाने थोडी सी बेवफाई, धनवान, अवतार, सौतन, फिर वही रात, अगर तुम न होते या चित्रपटांच्या यशानंतर कमबॅक केले… bollywood tadka
Original content is posted on: https://kalakrutimedia.com/this-is-publicit-knows-everything-marathi-info/
Comments
Post a Comment