Devgan CineX : सेलिब्रिटीज चित्रपट वितरण आणि प्रदर्शनात
कॅमेरासमोर अभिनय करता चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात कलाकाराने पाऊल टाकले हे मूकपटाच्या काळापासून सुरु आहे. काही कलाकार एक दोन चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात रमले आणि बाजूला झाले, तर काही कलाकारांनी त्यातही आपला ठसा उमटवला, चित्रपती व्ही शांताराम यांनी परेल येथे भव्य दिव्य दिमाखदार अशा राजकमल कलामंदिर स्टुडिओची स्थापना केली, राज कपूरनेही चेंबूर येथे अशाच भव्य अशा आर. के. स्टुडिओची स्थापना केली.
कलाकारांनी ( आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी त्यांना सेलिब्रिटीज म्हणते) चित्रपट वितरण आणि प्रदर्शन यातही पाऊल टाकणे विशेष उल्लेखनीय आहे. अजय देवगण हे ताजं उदाहरण. त्याने ठाणे शहरात ‘देवगण सिनेक्स’ हे पाच स्क्रीनचे मल्टीप्लेक्स सुरु केले आहे. पहिलाच चित्रपट आदित्य धर दिग्दर्शित सुपर डुपर हिट ‘ धुरंधर २’. या मल्टीप्लेक्सचे वैशिष्ट्य म्हणजे बटकिकर मोशन सीटस. म्हणजेच आपण चित्रपट एन्जॉय करत असताना पडद्यावरील दृश्यानुसार आपल्याला व्हायब्रेशन अनुभवायला मिळणार. म्हणजेच पडद्यावर ढिश्यूम ढिश्यूम मारधाड ऍक्शन सुरू झाली रे झाली की आपणही त्यात सहभागी आहोत असे वाटणार.
पडद्यावर आधुनिक मॉडेलच्या चकाचक गाड्यांचा जोरदार शोरदार पाठलाग सुरु झाला रे झाला की तोच वेग आपण बसल्या जागी एन्जॉय करणार. अर्थात, देशातील मुंबईसह अनेक मोठ्या शहरांतील मल्टीप्लेक्समध्ये हे आधुनिक तंत्रज्ञान अगोदरच आले आहे. देवगण सिनेक्स मल्टीप्लेक्स देशातील १९ शहरात एकेक करत सुरु होत आहे. त्यात मुंबई, अहमदाबाद, कानपूर, गुहाटी वगैरे वगैरे शहरांचा समावेश आहे.
अजय देवगण अशा प्रकारे चित्रपट प्रदर्शन व्यवसायात उभा राहिला आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल, अजय देवगणने चित्रपट वितरण क्षेत्रात पंचवीस वर्षांपूर्वीच पाऊल टाकले. तेव्हा त्याने देवगण एन्टरटेन्मेंट अशी चित्रपट वितरण कंपनी स्थापन केली. नाझ चित्रपटगृह इमारतीत चित्रपट वितरकांची अनेक वर्षे कार्यालये होती, त्यातील बसंत पिक्चर्स वितरण या कार्यालयात देवगण एन्टरटेन्मेंट वितरण हे कार्यालय स्थापन केले आणि तेव्हा खुद्द अजय देवगणही नाझमध्ये आला होता. वीरु देवगण दिग्दर्शित ‘हिन्दुस्तान की कसम’ इत्यादी चित्रपट त्याने वितरित केले. आणि आता तो चित्रपट प्रदर्शन व्यवसायात आला आहे.
कलाकारांनी चित्रपट वितरण आणि प्रदर्शन क्षेत्रातही उत्तम कामगिरी केल्याची काही उदाहरणे द्यायलाच हवी. चित्रपती व्ही शांताराम आणि प्लाझा चित्रपटगृह हे नाते अगदी चाळीसच्या दशकापासूनचे. राजकमल कलामंदिर निर्मित सगळे मराठी व हिंदी चित्रपट याच प्लाझा चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. व्ही शांताराम दिग्दर्शित ‘झनक झनक पायल बाजे’ (१९५५) हा चित्रपट पहिल्या रनला रौप्य महोत्सवी यशस्वी ठरलाच, पण नव्वदच्या दशकात हाच चित्रपट रिपीट रनला पुन्हा प्रदर्शित करण्यात आला तेव्हाही त्याला उत्तम यश प्राप्त झाले. जुने चित्रपट पुन्हा एकदा पाह्यची आवड असलेला मोठा रसिक वर्ग आपल्या देशात आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, स्वतः चित्रपती व्ही. शांताराम हे प्लाझा चित्रपटगृहावरील आपल्या चित्रपटाच्या डेकोरेशवर खास लक्ष देत.
कलाकारांनी चित्रपट वितरण आणि प्रदर्शनातही कार्यरत असणे यात आशा पारेख यांचेही नाव घ्यायला हवे. निर्माता आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी ‘बहारो के सपने’ (१९६९) या चित्रपटाची निर्मिती केली असता त्यांना वितरक मिळत नव्हता. या चित्रपटात आशा पारेख आणि राजेश खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असल्या तरी हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा राजेश खन्ना स्टार झाला नव्हता. तसा तो नवीनच होता आणि चित्रपटही ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्ण धवल होता. म्हणूनही चित्रपटाला वितरक मिळत नव्हता. म्हणून नासिर हुसेन आणि आशा पारेख यांनी जेम्स मुव्हीज वितरण ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि मग अनेक वर्षे नासिर हुसेन प्राॅडक्शनचे सगळे चित्रपट वितरित केले.
अमिताभ बच्चनने नवी दिल्लीत ॲथनिक फिल्म ही चित्रपट वितरण संस्था स्थापन करून एस. रामनाथन दिग्दर्शित ‘गिरफ्तार’ वगैरे वगैरे चित्रपट वितरित केले. अमिताभ बच्चनमध्ये एक व्यावसायिक दडलेला आहेच. ज्या क्षेत्रात आपण यशस्वी वाटचाल करतोय त्याच व्यवसायात आपण आणखी काही वाटा शोधाव्यात असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे आणि कौतुकास्पदही आहे. मग ते दादा कोंडके यांचे कामाक्षी चित्र प्रकाशन असो (त्याचा डोलारा विजय कोंडके यांनी अतिशय कल्पकतेने आणि हुशारीने वाढवला) वा स्मिता तळवलकरचे अस्मिता चित्र रिलीज असो. स्मिता तळवलकरने ‘चौकट राजा’ या चित्रपटाच्या वेळी चार वा अधिक तिकीटे घरपोच मिळतील अशी योजना आखली होती. आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला.
Comments
Post a Comment