Film Theatres : चित्रपटगृहाचे रुपडे बदलले; त्याचाही भन्नाट इतिहास…

 दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील अप्सरा चित्रपटगृह आपल्या अतिशय देखण्या अशा व्यक्तीमत्वाने लक्ष वेधून घेत असे. माझ्या अतिशय आवडत्या चित्रपट‌गृहातील ते होते. मूळ मुंबईकर असलेल्या आणि वयाची तीशीपार चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर अप्सरा चित्रपटगृहाची वास्तू आली असेलच. आत शिरताच समोर असणारे कारंजं आणि बाल्कनीकडे जाणारा रेड कार्पेट जिना. अर्थात मी आणि माझे मित्र अप्सरा असो अथवा दक्षिण मुंबईतील कोणतेही चित्रपटगृह असो. स्टाॅलचा हुकमी प्रेक्षक म्हणून टाळ्या शिट्यानी पिक्चर एन्जॉय करणारे. अप्सरा चित्रपटगृहात गेल्यावर त्याच स्टॉलच्या तिकीटात याच जिन्याने बाल्कनीत जावून खाली येत असे, आणि त्यातही काही वेगळाच आनंद मिळत असे.

याच अप्सरा चित्रपटाच्या जागी अगोदर म्हणजे इंग्रजांच्या काळापासून लॅमिग्टन नावाचे चित्रपटगृह होते. ते पाडून भव्य दिव्य दिमाखदार अप्सरा चित्रपटगृह आले आणि १८ जून १९६४ रोजी राज कपूर अभिनित व दिग्दर्शित ‘संगम’ या दोन मध्यंतरच्या चित्रपटाने त्याचे उद्घाटन झाले. मी मिडियात आल्यावर मुंबईतील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या इतिहासात डोकावू लागलो. नाझ चित्रपटगृह इमारतीत असलेल्या अनेक चित्रपट वितरकाची कार्यालयात जाऊन, ड्रीमलॅण्ड चित्रपटगृहासमोरच्या चित्रपट प्रदर्शकाच्या कार्यालयात वारंवार जाऊन अनेक गोष्टी जाणून घेतल्या. त्यातून बरीच माहिती मिळत जाताना भरपूर मनोरंजनही झाले.

अप्सरा चित्रपटगृहाचेच उदाहरण घ्या, त्याजागी लॅमिग्टन नावाचे एक थिएटर होते (म्हणून त्या रस्त्याला लॅमिग्टन रोड असेही म्हणतात.अगदी आजही म्हणतात.) त्याच लॅमिग्टन थिएटरच्या जागेवर अगोदर मूकपटाच्या काळात प्रेशियस थिएटर होते, चित्रपट बोलू लागला त्या काळात ते पाडून त्या जागी रियाल्टो नावाचे चित्रपटगृह आले आणि मग तेही पाडून १९४० साली लॅमिग्टन नावाचे चित्रपटगृह उभं राहिलं. चित्रपटगृहाचा इतिहास असा भन्नाट आणि रंजक आहे.

अप्सरा चित्रपटगृहही नवीन शतकाच्या पहिल्या दशकात पाडलं गेलं आणि त्याजागी उभे राहिले दोन स्क्रीनचे अप्सरा मल्टीप्लेक्स.‌ते वरच्या मजल्यावर होते. ते कधी सुरु झाले आणि कधी बंद पडले ते समजलेच नाही. मध्य मुंबईतील लालबाग, परळ, करी रोड, लोअर परळ, चिंचपोकळी येथील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचं आपलंसं असे भारतमाता चित्रपटगृह आता चकाचक आधुनिक तंत्रज्ञानासह सुरू झाले असताना मुंबईतील अशा अनेक चित्रपटगृहांची मूळकथा सांगायची तर….भारतमाता म्हणजे मूळ लक्ष्मी चित्रपटगृह. १९४० पासून भारतमाता चित्रपटगृह. एक जुन्या पठडीतील एकपडदा चित्रपटगृह. आता त्याची खुर्ची ( चेअर्स म्हणूया ) आरामदायी, सुखकारक. ४०९ आरामदायक आसन क्षमता आणि बाल्कनीत ४० विशेष बैठक. तसेच, डॉल्बी स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम आणि टू के प्रोजेक्शन अशी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे जुन्या काळातील चित्रपटगृहाच्या जागेवर नवीन चित्रपटगृह अथवा अशाच एखाद्या जुन्या काळातील चित्रपटगृहाच्या जागेवर एकादी भव्य इमारत अथवा मार्केट वा मॉल उभा राहिला याची एक रंजक माहितीपट पडद्यावर येईल अशी उदाहरणे केवढी तरी आहेत. ती मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा अनेक शहरांमध्ये तर झालेच पण देशाच्या विविध भागातही आहेत.

मूकपटाच्या काळापासून सुरु असलेल्या चित्रपटगृहाच्या जागेवर नवीन चित्रपटगृह वा इमारत उभी राहणारच. डॉ. भडकमकर मार्गावरील (तोच तो लॅमिग्टन रोड) इंपिरियल चित्रपटगृह हे मूकपटाच्या काळापासूनचे आहे. अलिकडेच तेथील खेळ थांबला आहे. आज ती इमारत पूर्ण निस्तेज उभी आहे. याच भडकमकर मार्गावरील मिनर्व्हा चित्रपटगृहाचाही वेगळा इतिहास आहे. मूळ जुन्या पठडीतील मिनर्व्हा चित्रपटगृह पाडून त्या जागी उंच आलिशान असे उभे राहिलेले मिनर्व्हा चित्रपटगृह महाराष्ट्राचे गौरवस्थान म्हणून ओळखले गेले. ईगल फिल्म या बॅनरचे निर्माते एफ. सी. मेहरा आणि शम्मी कपूर यांच्या मालकीच्या या चित्रपटगृहाच्या १४९९ या आसनक्षमतेत हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यानी ‘शोले’ एन्जॉय करणे थरारक अनुभव होता. मी गिरगावकर असल्याने तो मी घेतला आहे. माझ्या प्रगती पुस्तकातील ही एक महत्त्वाची गोष्ट.‌’मी मिनर्व्हात ‘शोले’ पाहिलाय.

एकपडदा चित्रपटगृहाचे रुपांतर मल्टीप्लेक्स कल्चरमध्ये केल्याची काही उदाहरणे आहेत. दक्षिण मुंबईतील स्टर्लिंग चित्रपटगृहात दोन स्क्रीन केले गेले. भव्य मेट्रो चित्रपटगृहात चार स्कीन झाले. बाराशे चौदाशे आसनक्षमतेत हाऊसफुल्ल गर्दीत चित्रपट पाहण्याचा आनंद काही वेगळाच असे. चित्रपट पाहण्यासाठी फक्त आणि फक्त चित्रपटगृह हीच एक गरज होती, त्या काळात अशी चित्रपटगृह आगाऊ तिकीट विक्रीसाठीची भली मोठी रांग लागे त्यातूनही आपलं अस्तित्व दाखवत. १९७२ साली देशात दूरदर्शन आले. काहींच्या घरात दूरचित्रवाणी संच आला. आणि आता घरबसल्या शनिवारी सायंकाळी मराठी चित्रपट आणि रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट पाहता येऊ लागला आणि चित्रपटगृहाना गर्दीची किंचितशी वा थोडीशी गळती लागली.

१९९२ साली देशात रंगीत दूरचित्रवाणी आणि चित्रफित ( व्हिडिओ) आला, आणखी दहा वर्षांनी उपग्रह वाहिन्यांच्या युगात घरबसल्या चित्रपट पाहणं वाढले…..या शतकाच्या सुरुवातीस मल्टीप्लेक्स कल्चर आले, काही वर्षांत तेही रुजले. आता तर जुन्या काळातील चित्रपटगृहांना मल्टीप्लेक्ससारखं सजावे लागतेय. शहरी आयुष्यात नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्गाची आवड, जीवनशैली म्हणजे महागडी मल्टीप्लेक्स संस्कृती.‌ चित्रपटगृह बदलत बदलत गेली हीदेखील एक रंजक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. न संपणारी., प्रत्येक एकपडदा चित्रपटगृहाची आपली एक वेगळी गोष्ट आहे.

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/history-behind-all-film-theatres-in-mumbai-including-single-screen-theatres/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?