Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….

 बंगलोरजवळलील रामगढच्या गावाच्या ‘शोले’च्या सेटवर अमजद खान गब्बरसिंगसोबत सैल्फी काढण्याचा आनंद घेतोय तोच ठाकूर गब्बरसिंग आणि संजीवकुमार एकत्र सेल्फी काढतात…. जे तुम्ही सोशल मीडियावर पाहिले, मी पाहिले, अनेकांनी एन्जॉय केले डिजिटल युगातील एक भन्नाट फंडा आहे.

डिजिटल, व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या युगात कोणाला नक्कीच काय काय नि कसे कसे सुचेल हे आता कल्पनेपलिकडे पोहचलय…आता ही करामत जुन्या फोटोंवर नवीन प्रक्रिया यावर अथवा पुरुष सेलिब्रिटीजला उघड्या निधड्या छातीत (अनेकदा तरी क्रिकेटर) आणि युवती सेलिब्रिटीजला त्याच्यासह आकर्षक बिकिनीत, अथवा ‘शोले’च्या सेटवर सगळे एकत्र जेवताहेत एवढ्यावरच थांबलेले नाही, आता चालती फिरती दृश्ये घडवली जात आहेत.

हे सगळे सुचते कसं हा एक प्रश्न असला तरी भविष्यात अख्खा ‘शोले’ एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्याने यू ट्यूबवर पाहायला मिळणार नाही ना? एका चित्रपटाचा प्रवास कुठे सुरु झाला आणि‌ बदलत्या तांत्रिक प्रगतीनुसार कसा चाललाय बघा. निर्माते जी. पी. सिप्पी, दिग्दर्शक रमेश सिप्पी, पटकथा संवाद लेखक सलिम जावेद यांनी ‘शोले’ जन्माला घालताना याचा जराही विचार केला नसेल. मुळात १५ ऑगस्ट १९७५ रोजी ‘शोले ‘ मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होताना तो सत्तर एमएमचा भला मोठा पडदा आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम हेच केवढे तरी नाविन्य होते.

खरं तर पच्छी दिग्दर्शित ‘अरांऊड द वर्ल्ड’ ( दुनिया की सैर) हा १९६८ सालचा चित्रपट आपल्या देशातील पहिला सत्तर एम एमचा चित्रपट. मुंबईत नॉव्हेल्ट चित्रपटगृहात सत्तर एम एम पडद्यावर तो होता. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘शोले’ देखील सुरुवातीला काहीसा नरमच होता. मग मात्र असा काही सुपर डुपर हिट‌ ठरलाय की चित्रपट रसिकांच्या किमान चार पिढ्या ओलांडूनही तो चर्चेत आहे. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीत डायलॉगबाजी आणि गीत संगीत नृत्याची पडदाभर रंगत संगत या गोष्टी महत्त्वाच्या हे ‘शोले’ अधोरेखित करतो.

‘शोले’  पन्नास वर्षांचा झाला आणि‌ विविध देशांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या त्याच्या भव्य दिव्य दिमाखदार प्रीमियरला हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यानी जबरा प्रतिसाद मिळाला. शोलेची‌ लोकप्रियता काय भन्नाट आहे हो. तांत्रिक प्रगतीनुसार ‘शोले’ च्या प्रवासात तो 4k restoration स्वरूपात येताना मूळ शेवटासह (क्लायमॅक्स) आजच्या मल्टीप्लेक्स युगातील चित्रपट रसिकांसमोर आला. त्यात काही दृश्याचा समावेश झाला. डिजिटल युगानुसार ‘शोले’ चे केवढे तरी मिम्स आले. त्यात डिजिटल पिढीची क्रियेटीव्हीटी दिसली.‌ ‘शोले’चे‌ ॲनिमेशन कमालीचे लक्षवेधक. ‘शोले’चे Mirodramas आले. तेही तितकेच भन्नाट. ‘शोले’ चे Gaming ही एकदम भारी.

सोशल मीडियातील ‘शोले’ चा न थांबणारा प्रवास एक अद्भुत आणि वैविध्यपूर्ण गोष्ट. पन्नास वर्षांपूर्वीचे मिनर्व्हा चित्रपटगृहावरचे ‘शोले’ चे देखणं डेकोरेशन, मिनर्व्हा चित्रपटगृहाबाहेरची ‘ शोले’ साठीची आगाऊ तिकीट विक्रीसाठीची भली मोठी रांग (जणू ती आजही कायम आहे असाही एकादा व्हिडिओ क्रियेट केला जाईलही), ‘शोले’ साठी मिनर्व्हा चित्रपटगृहात अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे असलेले तिकीट दर अशा वर्षानुवर्षे रंगवून खूलवून सांगितल्या जात असलेल्या गोष्टी आज डिजिटल युगात दिसताहेतच, पण आता त्याला दिली जात असलेली डिजिटल रुपे आजच्या ग्लोबल युगातील आधुनिक मनोरंजन आहे.

अगणित चित्रपट पडद्यावरुन उतरले रे उतरले की काळाच्या पडद्याआड जातात. ‘ शोले’ सारखे चित्रपट सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रात कायमच आपले अस्तित्व दाखवत असतात आणि हे यश कशातही मोजता न येणारे. ‘शोले’ कालही आजही आणि उद्याही असा हा खणखणीत यशस्वी प्रवास सुरु आहे. यावरच आणखी एक चित्रपट लिहिता आणि दिग्दर्शित करता येईल.. ‘शोले’ की ॲनिमेटेड कहानी.

this blog was originally published on : https://kalakrutimedia.com/sholay-movies-unstoppable-journey/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष