आता काय तर म्हणे, Sharvari Wagh ‘मधुबाला’ साकारणार…

 ‘मधुबाला’ सारखं दुसरं कोणी असू शकतो का? तर अजिबात नाही. मुळात कृष्ण‌ धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या युगात प्रत्येक अभिनेत्रीचे आपलं एक व्यक्तीमत्व, आपलं एक वैशिष्ट्य, आपली एक अभिनय शैली होती. नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, नूतन, कामिनी कौशल, नंदा तसेच वहिदा रेहमान, वैजयंतीमाला, माला सिन्हा, मुमताज… रंगीत चित्रपटाच्या युगातही या अभिनेत्री आपल्या त्याच वैशिष्ट्यांसह ओळखल्या जात. मधुबाला म्हटल्यावर एकाच वेळेस के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल ए आझम’ (१९६०) मधील अनारकली आणि सत्येन बोस दिग्दर्शित ‘चलती का नाम गाडी’ (१९५८) मधील खट्याळ रुपडे डोळ्यासमोर येतेच.

कमाल अमरोही दिग्दर्शित महल ( १९४९), गुरुदत्त दिग्दर्शित मिस्टर ॲन्ड मिसेस (१९५६), कालीदास दिग्दर्शित हाफ तिकीट (१९६२),‌ पी. एल. संतोषी दिग्दर्शित ‘बरसात की रात’ (१९६०), मेहबूब खान दिग्दर्शित ‘अमर’ (१९५४). अशा अनेक चित्रपटांतील विविधरुपी मधुबाला चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरली, त्यात ‘मधुबाला’ ‘सौंदर्य’ आणि दर्जेदार अभिनय यांचे अतिशय उत्तम दर्शन घडते. या चित्रपटांना आज साठ पासष्ट वर्षे पूर्ण होऊनही ते पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात हे त्या कलाकृतीचे यश, चित्रपट रसिकांच्या किमान तीन चार पिढ्या ओलांडूनही या चित्रपटाबाबत विशेष आकर्षण कायम आहे. ही आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीची खासियत आहे.

अनेक चित्रपट रसिकांच्या प्रशस्त घरांत आपल्याला मधुबालाचे अतिशय बोलके, देखणं असं भव्य मोठं चित्र पाहायला मिळते.‌ अशा घरात पाऊल टाकताच प्रसन्न वाटते. कुठे मधुबालाचा छान हसरा बोलका फोटो तर कुठे ‘ चलती का नाम गाडी ‘ मधील ओलेती मधुबाला. एकदम परफेक्ट फोटो. आजच्या जेन झी पिढीलाही ही मधुबाला आहे हे सांगावं लागतं नाही. मधुबालाच्या खाजगी आयुष्याबद्दलही काहीबाही चर्चा होत असते. मनोरंजन क्षेत्रातील कलाकाराबाबत कुचाळक्या अर्थात गाॅसिप्स होत असतेच. त्यात तत्थ किती हे कधीच कोणी समजून घेत नाहीत हे दुर्दैव.

अशा मधुबालावर चरित्रपट अर्थात बायोपिक निर्माण करण्याची जवळपास चार वर्षे तयारी सुरु आहे.‌ सुरुवातीला बातमी होती, या चरित्रपटाला तिच्या कुटुंबीयांची अजिबात परवानगी नाही. विशेषतः या चरित्रपटात मधुबालाचे खाजगी आयुष्य दाखवणं अजिबात मंजूर नाही असं म्हटलं जातं होतं. तो विरोध कसा मावळला ते समजले नाही. सोनी पिक्चर्स, मधुबाला वेऺचर्स आणि संजय लीला भन्साळी यांनी संयुक्तपणे या चरित्रपटाची निर्मिती करण्यात पाऊल टाकले. निर्मिती संस्था तगडी आहे, जोडीला चित्रपट व्यवसायात दबदबा असलेला निर्माता आहे, निर्मिती खर्चाची चिंता नाही ( चित्रपट निर्मिती आता महाखर्चिक झाली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही), व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करण्यात येईल हेही सांगायला नकोच.‌ पण मधुबाला कोण साकारणार? दुसरी मधुबाला असूच शकत नाही.

मधुबाला एकच होती आणि आहे. हे सर्वकालीन सत्य असूनही ‘ मधुबाला ‘ साकारण्यासाठी नायिका शोधली जात आहे. सुरुवातीला कियारा अडवाणीच नाव आले. मग सैय्यारा चित्रपटातील अनित पड्डा हिचे नाव आले. धुरंदरमधील सारा अर्जुन नक्कीच असेही म्हणता म्हणता आता शर्वरी वाघ हिचे या चित्रपटासाठी नाव आले आहे. या बातम्या येतच राहणार.  शर्वरी वाघच्या दिसण्यात विलक्षण गोडवा आहे. पण मधुबालाची विशिष्ट नजर कुठून आणणार? आपल्या चित्रपटसृष्टीतील मधुबाला, नूतन, स्मिता पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे विशेष त्यांची नजर अथवा कटाक्ष आहे. ती असावीच लागते. ती येत नाही.‌

माधुरी दीक्षित मधुबालासारखी दिसते. पण आजची माधुरी दीक्षित मूळ मधुबाला कितपत योग्य ठरेल? मधुबाला ( जन्म १४ फेब्रुवारी १९३३ आणि मृत्यू २३ फेब्रुवारी १९६९) असणं आणि मधुबाला साकारणे या फार फार भिन्न गोष्टी आहेत. तरीही चरित्रपटाचा अट्टाहास का? मधुबालाचे जुन्या कलाकृती पाहिल्या तरी प्रचंड समाधान मिळतेय, ते समाधान अन्य कोणी मधुबाला असणं यात आहे का ? शर्वरी वाघचीही निवड नक्की नाही, त्यातही बदल होऊ शकतो. आणि अखेर मधुबालाची भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांतील फूटेज काढून त्यावर संकलन करून हा चरित्रपट घडवावा लागेल असे दिसते…

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/sharvari-wagh-will-play-madhubala-in-her-biopic/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?