पांडू हवालदार : राज्य चित्रपट महोत्सवात २१ पैकी पाच पुरस्कार….

 वर्षे कशी नि कधी भरभर पुढे सरकताहेत बघा,

दादा कोंडके यांच्या ‘ पांडू हवालदार ‘ या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास चक्क ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई शहरात हा चित्रपट ९ मे १९७५ रोजी गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृह, दादर येथील कोहिनूर चित्रपटगृह आणि इतरत्र प्रदर्शित झाला आणि‌ पहिल्याच खेळापासून चित्रपट सुपर डुपर हिट‌ ठरला तो कायमचाच. प्रत्येक चित्रपटाच्या नावाला आपलं एक व्यक्तीमत्व असते. ते नाव घेताच अथवा आठवताना तो चित्रपट डोळ्यासमोर यायला हवा. ‘ पांडू हवालदार ‘ असाच एक चित्रपट आहे. दादा कोंडके यांनी आपल्या विशिष्ट शैलीत खुलवलेले त्या काळातील पोलिसांच्या आयुष्याचे दर्शन आहे.‌

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियात अशोक सराफ यांची अनेक पाॅडकास्टवर घेतली जात असलेल्या जवळपास प्रत्येक मुलाखतीत ‘ पांडू हवालदार ” या चित्रपटावर त्यांना हमखास प्रश्न विचारला जातोय. ( अशोक सराफ म्हणजे बरंच काही, अक्षरशः बरेच काही आहे. ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाबाबत बरेच काही सांगता येईल. त्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १९७५ साठीच्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात एकूण २१ पुरस्कारात या चित्रपटाने पाच पुरस्कार पटकावून बाजी मारली. लोकमान्यतेबरोबरच या चित्रपटाने राजमान्यताही संपादन केली.

राज्य चित्रपट पुरस्कारात सदिच्छा चित्र निर्मित’ पांडू हवालदार ‘ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक दादा कोंडके, सर्वोत्कृष्ट विशेष अभिनेता अशोक सराफ, सर्वोत्कृष्ट पटकथा राजेश मुजुमदार आणि सर्वोत्कृष्ट संकलन एन. एस. वैद्य असे पाच पुरस्कार पटकावले. त्या काळात पुरस्कारांची संख्या नेमकी होती आणि त्यात अशी बाजी मारणे विशेष उल्लेखनीय होते. यावर्षी या राज्य चित्रपट महोत्सवात एकूण सतरा चित्रपट स्पर्धेत होते.

सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन हे दोन्ही पुरस्कार फार फार गाजले. कारण, सर्वोत्कृष्ट चित्रपट व्दितीय क्रमांक गिरीराज पिक्चर्स निर्मित सामना आणि दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट तृतीय क्रमांक उदय चित्र‌ निर्मित बायांनो नवरे सांभाळा आणि दिग्दर्शक दत्तात्रय कुलकर्णी. हे तीन चित्रपट तीन प्रकारचे आहेत. त्यात ‘ बायांनो नवरे सांभाळा ‘ रंगीत असून पांडू हवालदार आणि सामना कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपट आहेत. आणखी एक विशेष, दादा कोंडके आणि डाॅ. जब्बार पटेल यांचे हे प्रथम दिग्दर्शन आहे. सामना चित्रपट अनेक कारणांमुळे सतत गाजला. या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गतवर्षी पुणे शहरातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात झालेल्या विशेष सोहळ्याला चित्रपट रसिकांच्या गर्दीने अखेर दरवाजे बंद करण्यात आले आणि त्याची चक्क बातमी झाली.

विशेष उल्लेखनीय गोष्ट, या चित्रपटाच्या खणखणीत यशाने आणि विशेष अभिनेता पुरस्काराने अशोक सराफ यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला वलय, वळण आणि वेग आला. संगीतकार राम लक्ष्मण याचा हा पहिला चित्रपट. राम म्हणजे विजय पाटील आणि लक्ष्मण म्हणजे सुरेन्द्र हेन्द्रे. दादा कोंडके यांनी या जोडीचे नामकरण राम लक्ष्मण केले.

पांडू हवालदार ‘ च्या प्रदर्शनास पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त म्हणजे १९९० साली कामाक्षी चित्र वितरणाच्या वतीने हा चित्रपट मुंबईत भारतमाता चित्रपटगृह आणि इतरत्र पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आणि रसिकांच्या पुढील पिढीकडून या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, मला आठवतंय हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होत असताना मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकाराना दादर येथील ब्राॅडवे मिनी थिएटरमध्ये याचा खास खेळ आयोजित करण्यात आला आणि तो संपल्यावर लोणावळा येथे एका विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले असता भरपूर गप्पा रंगल्या. दादा कोंडके यांनी कायमच मिडिया फ्रेंडली भूमिका ठेवली आणि आपल्या प्रत्येक चित्रपटाला भरभरून कव्हरेज मिळवले. हे मी जवळून अनुभवले आहे.

 ‘पांडु हवालदार ‘ मध्ये उषा चव्हाण, लता अरुण, रत्नमाला, गुलाब मोकाशी, मोहन कोठीवान, रुही इत्यादींच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची गीते दादा कोंडके, जगदीश खेबुडकर आणि राजेश मुजुमदार यांची असून छायाचित्रण अरविंद लाड यांचे आहे. जुन्या भारतमाता चित्रपटगृहात दादा कोंडके यांचे पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम असे अनेक चित्रपट एक आठवड्यासाठी पुन्हा पुन्हा प्रदर्शित होत आणि हमखास हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यानी एन्जॉय केले जात. सुपर डुपर हिट‌ चित्रपट कायमच लोकप्रिय असतोच. चित्रपट संस्कृतीतील ही एक वेगळी आणि लक्षवेधक गोष्ट आहे. पांडू हवालदार कितीही वेळा पहावा तीच रंगत आणि गंमत जंमत.

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/pandu-hawaldar-movie-completed-51-years-of-release/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?