Dr. Babasaheb Ambedkar : जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला अप्रतिम चरित्रपट!

 आज 14 एप्रिल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. साऱ्या जगाला मानवतेचा समतेचा महान संदेश देणारे  विश्व रत्न महामानव डॉ बी आर आंबेडकर . त्यानी वंचितांना, शोषितांना आत्मविश्वास  देवून आत्मनिर्भरतेचा नारा दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक चित्रपट बनले. आभाळा एवढे महान कार्य करणाऱ्या या  क्रांतीकारी महापुरूषाचा जीवनालेख तीन तासात पडद्यावर मांडणे तसे अवघडच. 1998 साली डॉ जंब्बार पटेल यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चित्रपट बनवला होता. हा सिनेमा आजवर त्यांच्या वर बनलेल्या सर्व चित्रपटात उजवा वाटतो. या सिनेमात डॉ. आंबेडकर यांची भूमिका दाक्षिणात्य कलावंत मामूटी यांनी साकारली होती. ही भूमिका त्यांना कशी मिळाली?

डॉ पटेल यांनी सुरुवातीला जगभरात अशा अभिनेत्याचा शोध घेतला, जो आंबेडकरांच्या ‘बुद्धिमान, विद्वान’ व्यक्तिमत्त्वाशी जुळेल. या शोधात शेकडो अभिनेत्यांचा विचार करण्यात आला, ज्यात रॉबर्ट डी नीरो यांचाही समावेश होता. डी नीरो यांना यात रस होता, पण त्यांची निवड झाली नाही कारण , त्यांना डॉ जंब्बार यांना आंबेडकरांच्या भूमिकेतील हवा असलेला  विशिष्ट Indo-British accent मिळत नव्हता. यानंतर त्यानी भारतातच शोध सुरू केला. डॉ. जब्बार पटेल यांना मल्याळम सुपरस्टार मामूटी एका मासिकात योगायोगाने सापडले आणि ते आंबेडकरांसारखे दिसू शकतात का, हे पाहण्यासाठी त्यांनी संगणकीय प्रतिमांचा वापर केला. मामूटी सुरुवातीला तयार नव्हते, कारण ते हिंदी चित्रपट करत नव्हते आणि आपल्या चाहत्यांच्या प्रतिक्रियेच्या भीतीने आपली ओळख असलेली मिशी काढण्याच्या कल्पनेनेच ते सुरुवातीला  घाबरले होते.

पटेल यांनी अखेरीस त्यांच्या राष्ट्रवादाच्या भावनेला आणि भूमिकेच्या पुरस्कार-विजेत्या क्षमतेला आवाहन करून त्यांना या भूमिकेचे महत्व पटवून दिले. भारत सरकारला रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटाच्या तोडीचा चित्रपट हवा होता. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागली, त्यापैकी तीन वर्षे केवळ संशोधनासाठी समर्पित होती. डॉ पटेल यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडनमधील Gray’s Inn  यांसारख्या प्रत्यक्ष ऐतिहासिक ठिकाणी चित्रीकरण केले. परळ आणि भायखला यांसारख्या जुन्या मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांची प्रतिकृती तयार करण्यासाठी मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये भव्य सेट उभारण्यात आले होते. मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी मामूटी यांचा चेहरा  रुंद करण्यासाठी आणि टक्कल पडल्याचे दाखवण्यासाठी फोम रबरचे तुकडे आणि चीक पॅड्सचा वापर केला. हे रूपांतर इतके अचूक होते की, अभिनेत्याला भूमिकेत पाहून आंबेडकरांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

डॉ. आंबेडकर आणि म. गांधी यांच्यातील संघर्षाच्या चित्रपटातील चित्रणासंदर्भात सेन्सॉरशिपचे प्रश्न टाळण्यासाठी, पटेल यांनी प्रत्येक संवाद वस्तुतः अचूक असल्याचे सिद्ध करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक पुरावे सादर केले होते. जब्बार पटेल यांचा उद्देश आंबेडकरांना केवळ संविधानाचे शिल्पकार म्हणून नव्हे, तर एक मानवतावादी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून दाखवण्याचा होता. त्यांनी त्यांचे वैयक्तिक संघर्ष, त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाईंसोबतचे नाते आणि अखेरीस त्यांनी स्वीकारलेले बौद्ध धर्मांतर यावर प्रकाश टाकला.

या चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत जे काळजाला भिडतात, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२०००) मधील काही ठराविक प्रसंग आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतात. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जेव्हा तरुण भीमराव उच्च शिक्षण घेऊन बडोद्याला परततात, तेव्हाचा हा प्रसंग आहे. ते एका पारशी लॉजमध्ये राहतात, पण ते हरीजन आहेत हे कळताच त्यांना तिथून हाकलले जाते. भर पावसात आपले सामान घेऊन झाडाखाली उभे असताना, त्यांना तहान लागते. पण तिथे असलेल्या पाण्यास त्यांना स्पर्श करू दिला जात नाही. हा प्रसंग प्रेक्षकांना अस्वस्थ करतो. इतका शिकलेला माणूस, जो परदेशातून डॉक्टर होऊन आला आहे, त्याला आपल्याच देशात साध्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे पाहून सामाजिक विषमतेची दाहकता जाणवते.

गांधीजी आणि बाबासाहेब यांच्यातील ‘पुणे करार’ (Poona Pact) प्रसंगहा चित्रपटातील सर्वात ‘इंटेंस’ (गहन) प्रसंग मानला जातो. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेद यात अतिशय संयतपणे दाखवले आहेत.या प्रसंगात बाबासाहेबांची तार्किक शक्ती आणि आपल्या समाजाच्या हक्कांबद्दलची तडजोड न करण्याची वृत्ती मामूटी यांनी आपल्या आवाजातून जबरदस्त मांडली आहे. महाडचा सत्याग्रह आणि ‘मनुस्मृती’ दहन हा प्रसंग खूप प्रभावीपणे पडद्यावर मांडला आहे. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठेसाठी होता.जेव्हा बाबासाहेब चवदार तळ्याचे पाणी आपल्या हाताने पितात, तेव्हा तो क्षण क्रांतीचा भासतो. त्यानंतर होणारे मनुस्मृतीचे दहन हा प्रसंग विषमते विरुद्धच्या लढ्याची कहाणी मांडतो. “गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील!” हा त्यांचा विचार या दृश्यातून स्पष्ट होतो.

चित्रपटाच्या उत्तरार्धात बाबासाहेब जेव्हा संविधानाचा मसुदा सादर करतात, तेव्हाचे त्यांचे भाषण ऐतिहासिक आहे. ते म्हणतात की, आपण राजकीय लोकशाही मिळवली आहे, पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ही राजकीय लोकशाही धोक्यात राहील. हा संवाद आजही तितकाच लागू होतो, जो बाबासाहेबांची दूरदृष्टी दाखवतो. रमाबाईंच्या निधनाचा प्रसंग हा चित्रपटातील सर्वात भावूक क्षण आहे. एका बाजूला बाबासाहेब गोलमेज परिषदेसाठी लंडनला जाण्याच्या तयारीत असतात किंवा आपल्या कार्यात व्यस्त असतात, आणि दुसरीकडे रमाबाई (सोनाली कुलकर्णी) आजारपणात प्राण सोडतात. बाबासाहेब जेव्हा घरी येतात आणि रमाबाईंचा देह पाहतात, तेव्हा मामूटी यांनी दिलेली प्रतिक्रिया—एक महान नेता जो जगासाठी लढतोय, पण आपल्या पत्नीच्या जाण्याने आतून कोलमडून गेला आहे हे पाहून प्रेक्षकांच्या पाहून डोळ्यांत पाणी येते.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाने इंग्रजीतील सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेता (ममूटी) आणि सर्वोत्तम कला दिग्दर्शन (नितीन चंद्रकांत देसाई) या श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले. भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, ‘भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालय’ आणि ‘संरक्षण मंत्रालय’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘स्वातंत्र्यदिन चित्रपट महोत्सवा’मध्ये, १५ ऑगस्ट २०१६ रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. हा चित्रपट Ministry of Social Justice and Empowerment  आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बनला होता. चित्रपटा चे बजेट  ₹ ८.९५ कोटीं होते. या चित्रपटाच्या निर्मितीचे व्यवस्थापन ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने केले.

this blog was orginally published on https://kalakrutimedia.com/dr-babasaheb-ambedkar-biopic-directed-by-jabbar-patel/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?