अलबेला…. Govinda याचाही
अलबेला असं म्हणताक्षणी चित्रपट रसिकांच्या एका पिढीच्या डोळ्यासमोर मा. भगवानदादा यांचे ‘ अलबेला ‘ रुपडे, १९५१ सालच्या या चित्रपटातील शोला जो भडके दिल मेरा धडके, धीरे से आजा रे, शाम ढले खिडकी तले, भोली सुरत दिल के खोटे, ये दीवाना ये अशी सर्वकालीन सुपरहिट गाणी आली असतीलच. या चित्रपटाला तब्बल पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत तरी ‘ अलबेला ‘ म्हटलं की हाच कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपट, त्यातील मा. भगवानदादा आणि गीता बाली यांची नृत्य अदा, राजेंद्र कृष्ण यांची गीते आणि सी. रामचंद्र अर्थात अण्णा चितळकर यांचे संगीत हेच प्रगती पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरते. या अलबेलाची गोष्ट एहसान रिझवी याची तर पटकथा आणि दिग्दर्शन भगवानदादा यांचे.
‘अलबेला ‘ नावाचा हिंदी चित्रपट आतापर्यंत तीनदा पडद्यावर आला. मेहमूदचा ‘अलबेला’ (१९७१) कधी आला आणि कधी गेला हे समजलेच नाही हे आश्चर्य. मेहमूद अफाट प्रतिभेचा आणि विनोदाचे उत्तम टायमिंग असलेला अष्टपैलू कलाकार. पण दिग्दर्शक ए. समशेर यांना त्याच्या गुणाचा उपयोग करून घेता आला नाही. या चित्रपटात अरुणा इराणी मेहमूदची नायिका होती. याशिवाय आय. एस. जोहर, राजेंद्रनाथ, रमेश देव, अचला सचदेव, धुमाळ यांच्या भूमिका आहेत. शंकर जयकिशन यांच्या संगीतातील किशोरकुमारने गायलेले मै हू अलबेला हे गाणे लोकप्रिय झाले पण तोपर्यंत चित्रपटांची रिळे थिएटरमधून गोडावूनमध्ये गेली देखिल.
गोविंदाचा ‘अलबेला’ पंचवीस वर्षांचा झाला. २० एप्रिल २००१ रोजी प्रदर्शित झाला. त्या दिवसांत गोविंदा एकदम फॉर्मात होता. त्याच्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकाराना शूटींग रिपोर्टीगसाठी आमंत्रित केले जाई तेव्हा गोविंदा अजूनही आलेला नसे, त्याची एकेक तारीख मिळावी म्हणून अनेक निर्माता आणि दिग्दर्शक याच सेटवर आलेले दिसत आणि त्यांची भेटही होई. सेटवरचा दिग्दर्शक तोपर्यंत अन्य कलाकारांवरची दृश्ये चित्रित करण्यात मग्न राही. अशातच गोविंदा सेटवर येई तो दुसऱ्या सेटवर जाण्यासाठी. हा आम्हा सिनेपत्रकारांना नेहमीचा अनुभव. तरीदेखील त्याला निर्माते आणि दिग्दर्शक करारबद्ध करत, त्याचे चित्रपट पूर्ण होऊन पडद्यावर येत. ते जास्त महत्वाचे आहे ना?
ऐश्वर्या रॉय मॉडलिंगकडून अभिनयाच्या क्षेत्रात आली तेव्हा अनेक जण तिला ‘प्लॅस्टिकची बाहुली’ म्हणत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) मधील तिची नंदिनीची अप्रतिम अदाकारी आणि बहारदार नृत्य पाहताच तिला प्रसार माध्यमे, चित्रपट रसिक आणि चित्रपटसृष्टी अधिक गंभीरपणे घेऊ लागले. गुणवत्ता महत्त्वाची असे म्हणतात ते उगीच नाही. हा ‘अलबेलाट दीपक सरीन चित्रपट. टोनी गाईड (गोविंदा) आणि प्रवाशी सोनिया (ऐश्वर्या राय) यांच्यातील ओळख, मग सहवास, त्यातून प्रेम अशी गोष्ट. चित्रपटात जॅकी श्रॉफ, नम्रता शिरोडकर, सईद जाफरी यांच्याही भूमिका. चित्रपटाची निर्मिती कुमार तौरानी आणि रमेश तौरानी यांची तर पटकथा हनी इराणी आणि जावेद सिद्दीकी यांची. संगीत जतिन ललित यांचे.चित्रपट माफक मनोरंजन करतो, म्हणून यशही माफकच. आपण कोणता चित्रपट पाह्यचा हे चित्रपट रसिकांना चांगले समजते.
…. आणखी एक ‘ अलबेला ‘ रुपेरी पडद्यावर आला. तोही मराठीत. ‘ एक अलबेला ‘(२०१६). या चित्रपटाची निर्मिती डाॅ. मोनिष बाबरे यांची, पटकथा शेखर सरताऺडेल आणि अमोल शेडगे यांची तर दिग्दर्शन शेखर सरताऺडेल यांचे. मा. भगवानदादा यांच्या आयुष्यावर आधारित हा चरित्रपट. मंगेश देसाई याने अतिशय मेहन , अभ्यास आणि उत्साहाने भगवानदादा साकारला. विद्या बालनने गीता बाली साकारली (हीच गोष्ट जास्त गाजली. यापेक्षा या चित्रपटाची जास्त चर्चा व्हायला हवी होती.) यासह या चित्रपटात विद्याधर जोशी, प्रसाद पंडित, स्वप्नील राजशेखर, शेखर फडके, श्रीराम कोल्हटकर, अरुण भडसावळे इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.
अलबेला म्हटले की भगवानदादा डोळ्यासमोर येतात, इतकं त्या चित्रपटाचे त्यांच्याशी घट्ट नाते जोडले गेले आहे. त्या काळात दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील इंपिरियल चित्रपटगृहात हा चित्रपट गाणी लोकप्रिय झाल्यावर दोन आठवड्यानंतर हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यानी चालू लागला…. आज या इंपिरियल चित्रपटगृहाची इमारत शांतपणे उभी आहे. तेथील खेळ केव्हाच थांबलाय…
Comments
Post a Comment