50 Years of Charas : अखेरच्या क्षणी सेन्सॉरने म्हटले, चित्रपटाचे नाव बदला !

विदेशात अनेक ठिकाणी चित्रीकरण झाले, चित्रपटात अनेक खलनायक असल्याने मारधाड वाढली, चित्रपटाचे एकूणच बजेट वाढवावे लागले, तेही केले आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे दिला आणि सेन्सॉरने पहिला सल्ला दिला, या चित्रपटाचं नाव बदला… यामागचे कारण काय, तर देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली असून चित्रपट सेन्सॉर करण्यासाठीचे नियमही बदलले आहेत. त्यात ‘CHARAS’ हे नाव चित्रपटाला अजिबात चालणार नाही. अजून आणीबाणी कायम आहे हे सेन्सॉरचे म्हणणं. अनुभवी निर्माता आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांना प्रश्न पडला, आता काय करायचं? मुहूर्तापासूनच या चित्रपटाचे नाव ‘चरस’ आहे.‌ तेव्हापासून चित्रपट पूर्ण होईपर्यंत अनेकदा त्याच्या दोन चार रिळाच्या चित्रीकरणानंतर सतत बातम्या येत राहिल्या.‌ आता चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत, चित्रपटाची अनेक शहरांतून पोस्टर्स, होर्डिंग्जही लागली आहेत, अशा वेळी ऐन वेळी नाव कसे बदलणार? ते करायचं तर खूपच मोठा खर्च आला.

सेन्सॉरला हे म्हणणं पटलं आणि ‘चरस’ सेन्सॉर संमत होऊन २८ मे १९७६ रोजी चित्रपट दणक्यात प्रदर्शित झाला. त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.‌ मुंबईत मेन थियेटर अलंकार आणि अन्य अनेक चित्रपटगृहात प्रचंड गाजावाजा करत ‘चरस’ प्रदर्शित झाला आणि‌ त्याला साधारण यशावर समाधान मानावे लागले. या चित्रपटाती आनंद बक्षी यांनी लिहिलेले आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेले कल की हंसी मुलाकात के लिये (पार्श्वगायक लता मंगेशकर आणि किशोरकुमार) हे गाणे लोकप्रिय झाले.‌ जे. ओम प्रकाश निर्मित आणि दिग्दर्शित आन मिलो सजना (१९७१) या चित्रपटातील अच्छा तो हम चलते है या चित्रपटातील गाण्यांच्या लोकप्रियतेवर आधारित हे गाणे आहे हे अगदी स्पष्ट आहे. ‘चरस’ हे रामानंद सागर यांच्या चित्रपटाच्या परंपरा आणि वैशिष्ट्याला साजेसे नाव नव्हते आणि चित्रपटही ‘त्यांचा’ वाटू नये असा. साठच्या दशकात रामानंद सागर यांनी गुनहगार (१९६०), जिंदगी ( १९६४), आरजू (१९६५), आँखें (१९६८), गीत (१९७०), ललकार (१९७२), जलते बदन (१९७३) अशी वाटचाल केली. आँखें हा त्यात वेगळा. नायकाची ( धर्मेंद्र) हेरगिरी हे मध्यवर्ती सूत्र आणि ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीकरण हे विशेष.

 ‘चरस’ मध्ये सत्तरच्या दशकातील हुकमी फाॅर्मुला अर्थात पित्याच्या खूनाचा नायकाने घेतलेला बदला. आणि जोडीला काही देशांमध्ये असलेला गर्दचा व्यापार व त्यातून बरबाद होणारी युवा पिढी. डॅशिग नायक हे सगळे रॅकेट उद्ध्वस्त करतो. या चित्रपटाची पटकथा वेद राही आणि रामानंद सागर यांनी लिहिली. चरस निर्मितीच्या काळात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकथा पडद्यावर आणि पडद्यामागे अशी दोन्हीकडे अधिक प्रमाणात रंगात येत होती. ते चित्रपटाच्या पत्थ्यावर पडले. प्रियकर सुरजकुमार (धर्मेंद्र) आणि सुधा (हेमा मालिनी) यांचे युरोपमधील माल्टा आणि रोम येथे खुललेले मनसोक्त मनमुराद प्रेम आणि त्याभोवती बाकीचे सर्व काही अशी चित्रपटाची मांडणी केली. पण एक ना धड असा प्रकार झाला. विदेशात चित्रीकरणासाठी संधी आणि सुविधा मिळाली म्हणून या चित्रपटाची निर्मिती झाली असं लक्षात येतं आणि म्हणूनच या चित्रपटाला साधारण यशावर समाधान मानावे लागले.‌ अमजद खानचा राॅबर्ट आणि अजितचा कालीचरण असे दोन खलनायक. त्या काळात रुपेरी पडद्यावर यांची बरीच दहशत होती. जोडीला निम्मूच्या भूमिकेत अरुणा इराणी. अशा ॲक्शन पॅक्ड मसालेदार मनोरंजक चित्रपटात छोट्या छोट्या व्यक्तिरेखा अनेक हेदेखील एक वैशिष्ट्य. नासिर हुसेन, मनमोहन कृष्ण, असरानी, केश्तो मुखर्जी, सुजीतकुमार, जयराज, सप्रू, विजू खोटे, शैलेश कुमार, मधुमती, आगा, सुंदर, टाॅम अल्टर… त्या काळातील चित्रपटसृष्टी अशी अनेकांना संधी द्यायची असं अनेक चित्रपटांतून दिसते. आपल्या चित्रपटसृष्टीची हीदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. या मनोरंजन क्षेत्रातील अनेक छोट्या छोट्या गोष्टी बरंच काही सांगून जातात. चित्रपट अभ्यासात हेदेखील अधोरेखित व्हायला हवे.

 चरसमधील मै एक शरीफ लडकी बदनाम हो गई (लता मंगेशकर) , आजा तेरी याद आयी ( मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर) ही गाणी लोकप्रिय झाली. आजा तेरी याद आयी या गाण्याचा मुखडा आनंद बक्षी यांनी गायलाय. या चित्रपटाचे छायाचित्रण प्रेम सागर यांनी केले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाखतीचा योग आला असता त्यांनी सागर आर्ट्सच्या संपूर्ण युनिटने चरसचे चित्रीकरण एन्जॉय केले असं आवर्जून सांगितले. असो, चरससारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील प्रेम कथा साकारलेल्या रामानंद सागर यांनीच काही वर्षांनी “रामायण” ही मालिका निर्माण केली आणि संपूर्ण देशभर रविवार सकाळी नऊ वाजता दूरचित्रवाणीसमोर सहकुटुंब सहपरिवार ही मालिका पाहिली गेली असेही यश प्राप्त केले. दरम्यानच्या काळात सागर आर्ट्सने अरमान, बगावत इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली… एखाद्या दिग्दर्शकाची आणि त्याच्या निर्मिती संस्थेची वाटचाल अशी चौफेर राहिली हे विशेष उल्लेखनीय.

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/50-years-of-bollywood-movie-charas-dharmendra-hema-malini/



Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?