ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘चुपके चुपके’या सिनेमाचे शूटिंग ‘जलसा’ या बंगल्यात झाले होते!
ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘चुपके चुपके‘ या सिनेमाचे शूटिंग ‘जलसा’ या बंगल्यात झाले होते!
ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘चुपके चुपके’ (१९७५) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात निखळ आनंद देणारा कौटुंबिक विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. उपेन्द्रनाथ गांगुली यांच्या ‘छद्मवेशी’ या बंगाली कथेवर आधारित हा चित्रपट आजही तितकाच ताजातवाना वाटतो. चित्रपटाची कथा अतिशय साधी पण खुसखुशीत आहे. वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक परिमल त्रिपाठी (धर्मेंद्र) यांचे लग्न सुलेखाशी (शर्मिला टागोर) होते. सुलेखा तिचे ‘जीजाजी’ राघवेंद्र शर्मा (ओम प्रकाश) यांच्या बुद्धिमत्तेची आणि आदर्शवादाची सतत स्तुती करत असते. हे पाहून परिमलला एक खोडसाळ कल्पना सुचते. जीजाजींना ‘मूर्ख’ बनवण्यासाठी परिमल त्यांच्या घरी ‘प्यारेलाल’ नावाचा ड्रायव्हर बनून जातो जो शुद्ध हिंदी बोलतो. यातून निर्माण होणारे गैरसमज आणि विनोदी प्रसंग म्हणजे हा चित्रपट. ऋषिकेश मुखर्जी यांना ‘मध्यममार्गी सिनेमाचे सम्राट’ म्हटले जाते. ‘चुपके चुपके’ मध्ये त्यांनी कुठेही बटबटीत विनोद किंवा अश्लीलतेचा आधार घेतलेला नाही. चित्रपटाचा वेग मध्यम असून संवादफेकीवर त्यांचा विशेष भर होता. कथेतील गुंतागुंत वाढत असूनही प्रेक्षक कुठेही गोंधळत नाहीत, हे त्यांच्या दिग्दर्शनाचे यश आहे.
धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन या जोडीने ‘शोले’ मध्ये धिंगाणा घातला होता, पण इथे त्यांचा ‘कॉमिक टायमिंग’ थक्क करणारा आहे. धर्मेंद्र यांनी ड्रायव्हर प्यारेलालच्या भूमिकेत केलेली शुद्ध हिंदीची फटकेबाजी अप्रतिम आहे. अमिताभ बच्चन यांनी साकारलेला ‘प्रोफेसर सुकुमार’ आणि त्याची इंग्रजी-हिंदीमधील गडबड प्रेक्षकांना खळखळून हसवते. राघवेंद्र यांच्या भूमिकेत ओम प्रकाश यांनी एक शिस्तप्रिय पण प्रेमळ व्यक्ती सुरेख साकारली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले भाव सिनेमाची रंगत वाढवतात. शर्मिला टागोर आणि जया बच्चन: या दोघींनीही आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. विशेषतः जया बच्चन आणि अमिताभ यांच्यातील दृश्ये साधी पण प्रभावी आहेत. या चित्रपटाचा खरा हिरो म्हणजे त्यातील संवाद (गुलजार). हिंदी भाषेचा वापर करून विनोद कसा निर्माण करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. ‘फूल’ (Fool) आणि ‘फूल’ (Flower) मधील गोंधळ किंवा शुद्ध हिंदीचे व्याकरण यावर आधारित विनोद अतिशय दर्जेदार आहेत. सचिन देव बर्मन यांचे संगीत चित्रपटाच्या वातावरणाला साजेसे आहे.
‘चुपके चुपके चल री पुरवैया’ हे गाणे आजही तितकेच श्रवणीय वाटते.‘अब के सजन सावन में’ हे गाणे पावसाळ्यातील विरहाची आणि थट्टेची छान सांगड घालते. चित्रपट केवळ विनोद करत नाही, तर भाषेचा अभिमान आणि मानवी स्वभाव यावरही भाष्य करतो. एखाद्या व्यक्तीचा ‘इगो’ (अहंकार) कसा गमतीशीर पद्धतीने मोडीत काढता येतो, हे परिमलच्या पात्रातून दिसते.’चुपके चुपके’ हा चित्रपट केवळ विनोदी नाही, तर तो कौटुंबिक मूल्यांचे दर्शन घडवणारा एक सुसंस्कृत सिनेमा आहे. धावपळीच्या आयुष्यात मनावरचा ताण हलका करण्यासाठी हा चित्रपट आजही एक उत्तम ‘टॉनिक’ आहे. जर तुम्हाला साधेपणा, उत्तम संवाद आणि दर्जेदार अभिनयाची आवड असेल, तर हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच आहे. ‘चुपके चुपके’ ११ एप्रिल १९७५ रोजी प्रदर्शित झाला आणि तो सर्वांना खूप आवडला. हृषिकेश मुखर्जींना सुकुमार सिन्हा आणि वसुधा (अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांनी साकारलेल्या) यांच्या भूमिकांसाठी दोन नवीन कलाकारांना घ्यायचे होते. ते कलाकारांचा शोध सुरू करणारच होते, तेवढ्यात अमिताभ बच्चन आणि जया त्यांच्याकडे आले आणि त्यांनी ऋषी दा यांना त्या भूमिका देण्याची विनंती केली.
ऋषी दा यांनी त्यांना सांगितले की त्या भूमिका खूप छोट्या आहेत. पण तो ऋषी दा यांचा चित्रपट असल्याने, त्या दोघांनाही कोणत्याही परिस्थितीत त्यात काम करायचे होते. हृषिकेश मुखर्जी यांना ‘चुपके चुपके’मधील शर्मिला टागोर यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी आशा पारेख यांना घ्यायचे होते. मात्र, धर्मेंद्र यांना ती भूमिका शर्मिला टागोर यांनीच करावी असे वाटत होते. त्यांनी शर्मिला टागोर यांना त्या भूमिकेसाठी घ्यावे म्हणून ऋषी दा यांच्याकडे अनेक दिवस विनवणी केली होती.
या चित्रपटाची निर्मिती एन.सी. सिप्पी यांनी केली होती आणि चित्रपटाचे जवळजवळ संपूर्ण चित्रीकरण त्यांच्या या ‘मनसा ‘ या बंगल्यातच पूर्ण झाले होते. १९७७ मध्ये त्यांचा ‘इंकार’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, एन.सी. सिप्पी यांनी नवीन बंगला विकत घेतला आणि हा बंगला विकला. खरे तर, त्याच बंगल्यातून कोणीतरी त्यांचा मुलगा, रोमू सिप्पी, याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता म्हणे . योगायोगाने, ‘इंकार’ या चित्रपटातही एका मुलाच्या अपहरणाचा प्रसंग आहे.
तुम्हाला माहित आहे का? एन.सी. सिप्पींनी तो बंगला कुणाला विकला? अमिताभ बच्चन यांना. आज तो बंगला ‘जलसा‘ नावाने ओळखला जातो. मुंबईतील जुहू येथे स्थित असलेले आणि अमिताभ बच्चन यांचे मुख्य निवासस्थान असलेले ‘जलसा‘ हे एक विशाल, दुमजली बंगला असून, त्याचे मूल्य अंदाजे ₹१०० ते १२० कोटी इतके आहे. व्ही.एल. मेहता रस्त्यावर, ‘जे.डब्ल्यू. मॅरियट‘ आणि ‘पृथ्वी थिएटर‘ यांच्या नजीक वसलेली ही वास्तू एक प्रमुख लँडमार्क म्हणून ओळखली जाते. आपल्या लाकडी प्रवेशद्वारांसाठी प्रसिद्ध असलेल्या, १०,१२५ चौरस फूट क्षेत्रफळाच्या या घरात बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्या वास्तव्यास आहेत.
Comments
Post a Comment