Kalakruti Special : शाळा, काॅलेज आणि चित्रपट
चित्रपट माध्यम आणि व्यवसाय यांचा जनसामान्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींशी, जवळपास सर्वच सण संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, वाढदिवस घटक, लग्न संस्कृती यांच्याशी संबंध आहे. तसाच तो शाळा कॉलेज यांच्याशीही आहे. चित्रपटाच्या नावात ‘शाळा’ (मराठी), ‘स्टुडंट्स ऑफ द इयर’ (हिंदी) यापासून त्याची सुरुवात होते. खरं तर हा बहुस्तरीय, बहुढंगी, बहुरंगी विषय. त्यातही ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील शिक्षणाचे धडे वेगळे आणि ‘इम्तिहान’ (Vinod Khanna आणि Tanuja) या चित्रपटातील गोष्ट वेगळी. आणखी एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, साठच्या दशकात विशेष: दक्षिण मुंबईत जन्माला आलेल्या माझ्या पिढीला प्राथमिक शाळेत असताना अनेकदा तरी रविवार सकाळ कधी येतेय असं व्हायचं. (दूरचित्रवाणी येण्यापूर्वीचा हा काळ. मध्यमवर्गीय सरळमार्गी जीवन) याचं कारण, रविवारी सकाळी नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेकदा तरी बालचित्रपटाचे खेळ असत आणि त्या वयात तसे चित्रपट पाहण्यात एक विशेष आनंद मिळे. ती मानसिक गरज असे. मला आठवतंय, आमच्या गिरगावातील मॅजेस्टीक, सेंट्रल, रॉक्सी या चित्रपटगृहात असा रविवार सकाळचा एक शो असे. कधी फक्त आम्हा शालेय विद्यार्थ्यांनाच प्रवेश असे आणि पालक आम्हाला थिएटरवर सोडायला आणि न्यायला येत. कधी पालकांसोबत प्रवेश असे. मुलांना पन्नास पैसे आणि पालकांना पंचाहत्तर पैसे तिकीट दर असे. हे मला आठवतंय. मुन्ना, संताजी धनाजी, प्रार्थना, श्यामची आई, जागृती, छोटा जवान असे आदर्शवादी चित्रपट त्यात दाखवले जात. अशा चित्रपटातून मुलांनी काही चांगला आदर्श घ्यावा अशी सकारात्मक अपेक्षा असे. त्यातील काही चित्रपटांचे तत्पूर्वी व्यावसायिक प्रदर्शन होऊन काही वर्षे झाली होती. पण बालवयात असे चित्रपट मुलांना दाखवावेत हा त्यामागचा हेतू चांगला होता. आमची पिढी याबाबत खूप भाग्यवान होती. वाचनालय, संगीत शिक्षण याबरोबरच असे बालचित्रपट हे शालेय वयात जडणघडणीत महत्त्वाचे असत.
हळूहळू हे मागे पडत गेले. काळ बदलत गेला. २ ऑक्टोबर १९७२ रोजी दूरचित्रवाणी माध्यम आले. तरीदेखील ते सुरुवातीला अगदी एखाद्याच्या घरी असे. ते घरोघरी पोहोचायला आठ-दहा वर्षे लागली हे आज वयाची साठी ओलांडलेल्या लक्षात आले असेलच. मात्र त्यावर कालांतराने शालेय शिक्षणाचे अर्धा-एक तासाचे कार्यक्रम आले. पण चित्रपटात शाळा अथवा कॉलेज हे अनेक प्रकारे आणि कमी-जास्त प्रमाणात येत राहिले. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या काळापासून ते आजपर्यंत ते सुरू आहे. आठ एमएम, सोळा एमएम, पस्तीस एमएम, सिनेमास्कोप, सत्तर एमएम असा हा प्रवास आहे. अनेक चित्रपटांत नायक कसा कोण जाणे पण शाळेत पहिला क्रमांक पटकावून घरी आल्यावर त्याची वृद्ध आई भिंतीवरच्या नायकाच्या स्वर्गवासी वडिलांच्या फोटोकडे पाहत म्हणायची, “आज तुम्हारे पिताजी होते तो कितना खुश होते… आ तेरे लिए मैने गाजर का हलवा बनाया है…” अनेक हिंदी चित्रपटातील हे हुकमी दृश्य. आणि चित्रपट रसिकही ते एन्जॉय करीत. गाजर का हलवा हिंदी चित्रपटाने समाजातील खालच्या माणसापर्यंत पोहोचवला आणि शाळेत वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना असं काही गोडधोड पदार्थ खायला-प्यायला देण्याची संस्कृती रुजली.
S. H. Rawail दिग्दर्शित ‘मेरे मेहबूब’मध्ये कॉलेजमध्ये नायकाचा (Rajendra Kumar) अचानक बुरखाधारी नायिकेला (Sadhana) धक्का लागतो, तिच्या हातातील पुस्तके खाली पडतात आणि ती उचलताना दोघांची नजरानजर होते. तिचे डोळे पाहून त्याचा कलेजा खल्लास होतो. (आणि युवा पिढीतील रसिकांचाही) आणि तो क्लोजअप “मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम” या गाण्यातही येतो. आता अभ्यास राहिला बाजूला. Ravi Tandon दिग्दर्शित ‘खेल खेल में’ या चित्रपटात कॉलेजमधील मौजमस्तीतून चक्क तीन खून होतात असा रहस्यरंजक प्रकार होता. अभ्यास सोडून नस्ते उद्योग. याच चित्रपटाच्या Abbas-Mustan दिग्दर्शित ‘खिलाडी’ या रिमेकमध्येही अर्थात हेच. अनेक चित्रपटांत कॉलेज फक्त धमाल करायला, प्रेम जुळायला आणि फायटिंग एवढ्यासाठीच दिसले. कुठे शिक्षक व शिक्षिकेचे प्रेमही रंगले. कधी तिशीतील हिरो कॉलेज विद्यार्थी असे. हिंदी चित्रपटात सगळे क्षम्य असते हे एकदा मान्य केलेत की काहीही पाहण्याची तयारी हवी. ‘इम्तिहान’, ‘अंजान राहे’, ‘बंदीश’, ‘दिल्लगी’, ‘तेजाब’, ‘दिल’, ‘फूल और कांटे’ वगैरे बरीच नावे आहेत. तो अभ्यास म्हणायचा का? असे शिक्षण पाहून युवक बिघडतात अशी सामाजिक सांस्कृतिक प्रतिक्रिया उमटली.
यात Gulzar दिग्दर्शित ‘परिचय’मध्ये एका छोट्याशा टुमदार गावातील एका श्रीमंत कुटुंबातील वात्रट मुलांना घरी शिकवणी देत-देवत अभ्यासाची गोडी लावणाऱ्या शिक्षकाची (Jeetendra) गोष्ट होती. Jeetendraची अगदी वेगळी भूमिका. त्याचा शिक्षकाचा लूक वेगळा आहे. Gulzar दिग्दर्शितच ‘किताब’ हा चित्रपट खूपच आशयवादी आणि वेगळा. त्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वभावानुसार गोष्ट रंगवली होती. त्यांची मानसिकता, दंगामस्ती, शिक्षणाची गोडी, शाळेचे वास्तव जग अशा गोष्टी होत्या. त्यांना उगाच फिल्मी केले नव्हते की लहान वयात मोठ्यांसारखे वागवले नव्हते. Uttam Kumar व Vidya Sinha, Raju Shrestha, Tito Khatri प्रमुख भूमिकेत होते. Gulzar यांच्या कलाकृतीत कायमच गांभीर्य असते. ते वेगळ्या पद्धतीने ‘शाळा’ घेतात. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था आपल्या देशात रुजल्यानंतर ‘शाळा, कॉलेज चित्रपटात’ या संस्कृतीत बराच फरक पडला. ते मॉडर्न झाले. देशातील विविध भागांतील शाळा-कॉलेजेस त्यात बहुस्तरीय प्रमाणात दिसू लागली. हादेखील एक वैशिष्ट्यपूर्ण बदलच. Aamir Khan दिग्दर्शित ‘तारे जमीन पर’पासून Rajkumar Hirani दिग्दर्शित ‘थ्री इडियट्स’पर्यंत अनेक चित्रपटांत ते दिसले. त्यात प्रामुख्याने शाळेपेक्षा स्कूल, हायस्कूल होते (हा हाय म्हणजे उच्च) आणि नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्गातील ‘स्टुडंट्सच्या स्टोरीज’ (अर्थात कथा, पटकथा व संवाद) दिसल्या. अनेक ‘स्कूल’ तर हिल स्टेशनवरची दिसली. विदेशातीलही हायफाय स्कूल हिंदी चित्रपटात आली. (‘कुछ कुछ होता है’, ‘मोहब्बते’) तात्पर्य, गोष्ट शाळेची असो अथवा कॉलेजची, चित्रपटाचे मनोरंजनाचे रंगीत मूल्य आणि फोकस कायम राहील याचे व्यावसायिक भान होते.
आता मल्टिप्लेक्स युगात ‘गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष’ पडद्यावर कोण आणणार हा प्रश्नच होता. मल्टिप्लेक्स ही उच्चभ्रू आणि नवश्रीमंत वर्गासाठीची चित्रपट एन्जॉय करण्याची जागा. तरी बिहारमधील गणिताचे शिक्षक Anand Kumar यांच्या संघर्षमय आयुष्यावरचा आणि Hrithik Roshan ने अतिशय मेहनतीने साकारलेला Vikas Bahl दिग्दर्शित ‘Super 30’ हा चित्रपट अंतर्मुख करतो. उत्तम कथा आशय असलेली कलाकृती. अशा चित्रपटांची आज जास्त गरज आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यावरचा आणि वाढत्या शैक्षणिक क्लासेसचा बुरखा फाडणारा हा चित्रपट आहे. तर ‘छिछोरे’, ‘स्टुडंट्स ऑफ द इयर’, ‘चिल्लर पार्टी’, ‘स्टेनली का डब्बा’, ‘उडान’, ‘पाठशाला’, ‘इंग्लिश विंग्लीश’, ‘नोटबुक’, ‘चले चले’, ‘हिंदी मिडियम’, ‘चक दे डस्टर’, ‘फालतू (फकीरचंद और लकीरचंद)’, ‘हिचकी’ अशा अनेक चित्रपटांत ‘स्कूलमधील वेगवेगळे रंगढंग’ दिसले. हा एक प्रकारचा विषयाचा विस्तारवाद. बिहारमधील शैक्षणिक आरक्षणावरचा Prakash Jha दिग्दर्शित ‘आरक्षण’ थोडा प्रचारकी, बराचसा फिल्मी होता. चित्रपट यशस्वी ठरला तरी त्याचा सामाजिक-सांस्कृतिक माध्यम प्रभाव फार नव्हता.
मराठीत Sujay Dahake दिग्दर्शित ‘शाळा’, Sanjay Jadhav दिग्दर्शित ‘दुनियादारी’, Ravi Jadhav दिग्दर्शित ‘बालक पालक’, Nagraj Manjule यांचा ‘सैराट’, Paresh Mokashi दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’ अशा अनेक मराठी चित्रपटांत शाळा, कॉलेजमधील वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शालेय वयातील प्रेमाची गोष्ट काही मराठी चित्रपटांतून आली. ना कळत्या वयातील ते प्रेम होते. काही मराठी चित्रपटांत ग्रामीण भागातील शाळेचे एखादे दृश्य वा व्यक्तिरेखा असते. (उदा. ‘पोस्टर बॉईज’) शाळा कॉलेजमधील आयुष्याची जडणघडण खूपच महत्त्वाची गोष्ट. ती अनेक फिल्मवाल्यांनी आपापल्या दृष्टिकोन व क्षमतेनुसार रुपेरी पडद्यावर आणली. त्यातून बरेच मनोरंजन झाले, त्यासह प्रबोधनही अपेक्षित असते. ते चित्रपट रसिकांच्या दृष्टिकोनावर आहे. असाच जर फिल्मवाल्यांचा ‘अभ्यासक्रम’ असेल तर त्याला आपण काय करणार?
पुणे शहरात संवाद या संस्थेच्या वतीने दरवर्षी बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यात प्रामुख्याने शालेय वयातील मुलांच्या गोष्टी पाहायला मिळतात हे आवर्जून सांगायला हवे. कॉलेजच्या दिवसांत लेक्चर बंक करून (बुडवून, दांडी मारायची) आणि मॅटिनी शोला जायचेच ही एक वेगळी चित्रपट संस्कृती. साठच्या दशकांपासून प्रत्येक युवा पिढीने ती अनुभवलीय. त्यावर पुन्हा कधी तरी फोकस. ते दिवस, त्या धमाल आठवणी. आपल्या देशात चित्रपट केवळ पडद्यावर राहत नाही, तो असा आयुष्य व्यापून टाकतो.
Comments
Post a Comment