Rajesh Khanna : राजेश खन्नाचा ‘चलता पूर्जा’ नावाचा चित्रपट माहितेय का ?

सर्वसाधारण अलिखित नियम काय आहे? काळ कृष्ण धवल अर्थात Black & White चित्रपटाचा असो अथवा कलरफुल सिनेमाचा असो, कोणत्याही कलाकाराचे (आज ज्यांना सेलिब्रिटीज म्हटले जाते) सुपर डुपर हिट चित्रपट जास्त माहित असतात. काळ बदलला, पुढे सरकला, माध्यमे बदलली, तरीही त्या यशस्वी चित्रपटांना फॉलो केले जाते. जे भारी सिनेमाप्रेमी आहेत (ज्यांना ‘सिनेमातले कीडे’ म्हटले जाते), ते न चाललेल्या, साफ पडलेल्या, रसिकांनी नाकारलेल्या अशाही चित्रपटांची नावे सांगू शकतात. एखाद्या कलाकाराचे दिवाने तर त्या कलाकाराचे मुहूर्ताला म्हणा किंवा चार-सहा रिळांचे चित्रीकरण झाल्यावर म्हणा, कायमचे डब्यात गेलेल्या चित्रपटाबाबतही बोलू, सांगू, ऐकू शकतात. चित्रपट इतिहासात डोकावताना हे असेही अनेक फंडे आहेत आणि चित्रपट अभ्यासात हेदेखील यायला हवे. Rajesh Khanna यांचेही असेच अनेक पडद्यावर येताच फर्स्ट शो सुटताच फ्लॉप झालेले, जेमतेम पडद्यावर येऊन प्रदर्शित झाल्याची नोंद असलेले, मात्र अपयशी ठरलेले, अधेमधे बंद पडलेले पिक्चर अनेक. त्यात किती वेळ, पैसा, शक्ती खर्च होत असते याची मोजदाद नाही. चित्रपटाच्या जगात खरं तर काहीच मोजायचे नसते. ते संपणारे नाही.

असाच एक Rajesh Khanna यांचा रखडून रखडून एकदाचा पडद्यावर आलेला चित्रपट Bhappi Soni दिग्दर्शित ‘चलता पुर्जा’. २४ जून १९७७ रोजी तो एकदाचा प्रदर्शित झाला आणि मोजून तीन आठवड्यात गेलादेखील. अहो, ज्या Rajesh Khanna यांच्या ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘कटी पतंग’ असे अनेक चित्रपट अनेक शहरांतून आणि अनेक चित्रपटगृहात पंचवीस, पन्नास आठवड्यांचा मुक्काम करत, त्यांचा चित्रपट अवघ्या तीन आठवड्यात उतरावा हे आश्चर्यकारक वाटते का? ते Rajesh Khanna यांचे खरोखरच वाईट दिवस होते. त्यांची लोकप्रियता ओसरली होती. Gulshan Rai निर्मित आणि Yash Chopra दिग्दर्शित ‘दीवार’ (मुंबईत प्रदर्शित २४ जानेवारी १९७५) आणि G. P. Sippy निर्मित आणि Ramesh Sippy दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) या चित्रपटांच्या अक्राळविक्राळ लोकप्रियतेने सामाजिक, सांस्कृतिक माध्यम वातावरण ढवळून आणि बदलून गेले होते आणि याचा तडाखा Rajesh Khanna यांना जास्त बसला. अशातच Rajesh Khanna यांच्याकडून अपेक्षा असलेल्या Raj Khosla दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ (१९७५) आणि Shakti Samanta दिग्दर्शित ‘मेहबूबा’ (१९७६) या दोन्ही चित्रपटांना रसिकांनी नाकारले आणि Rajesh Khanna यांची घसरण जाणवू लागली.

आता तेही गोंधळले आणि निर्मितीवस्थेतील चित्रपटात कोणता अगोदर प्रदर्शित व्हावा आणि कोणता मागे ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला. त्याचा चार-पाच वर्षे त्याच्या जवळपास सर्वच चित्रपटांना फटका बसला. या त्यांच्या पडत्या काळात प्रदर्शित झालेल्या ‘अनुरोध’, ‘छैला बाबू’, ‘अमरदीप’ या चित्रपटांना साधारण तरी यश मिळाले, पण ‘महाचोर’, ‘आशिक हूँ बहारों का’, ‘प्रेम बंधन’, ‘चक्रव्यूह’, ‘टिंकू’, ‘आयना’, ‘नौकरी’, ‘पलकों की छाँव में’, ‘कर्म’, ‘बंडलबाज’ (या चित्रपटाचे दिग्दर्शन Shammi Kapoor यांचे होते), ‘जनता हवालदार’ (या चित्रपटाचे दिग्दर्शन Mehmood यांचे आहे आणि त्याला Rajesh Khanna यांनी चित्रीकरणासाठी तारखा देण्यास फारच टाळाटाळ केली, तगवले आणि यावर Mehmood रागावलाही. या सगळ्यातून हा चित्रपट विनोदी न होता हास्यास्पद झाला) या चित्रपटांना अपयश आले.

या अपयशातून आपल्याला नक्कीच बाहेर काढेल असा त्यांचा विश्वास असलेला Bharathiraja दिग्दर्शित ‘रेड रोझ’ (६ जून १९८०) रसिकांनी नाकारला, पण त्याच्या पुढच्याच शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या Ismail Shroff दिग्दर्शित ‘थोडी सी बेवफाई’ (१३ जून १९८०) मुळे Rajesh Khanna यांची ही पडझड थांबली. याचे कारण या चित्रपटात दमदार कथानक आहे, Gulzar यांच्या गीतांना Khayyam यांचे सुमधुर संगीत आहे. गुणवत्ता ही महत्त्वाची गोष्ट आहे हे मधल्या काळात Rajesh Khanna कसे बरे विसरले? आपले चित्रपट एकामागोमाग एक फ्लॉप होत आहेत यामुळे ते गोंधळले की वारे Amitabh Bachchan यांच्या बाजूने असल्याचा फटका बसला? ‘चलता पुर्जा’ १९७४ साली सेटवर गेला होता, पण पुढे सरकेना. Kader Khan यांची पटकथा होती. चित्रपटात Rajesh Khanna यांची नायिका Parveen Babi आहे. जोडीला Rakesh Roshan, Ranjeet, Ajit, Asrani, Jankidas, Dev Kumar, Murad, Sudhir आणि Dhumal यांच्या भूमिका. संगीत Rahul Dev Burman यांचे! पण चित्रपट निर्मितीत रखडल्याने त्यातील गाणीही फार गाजली नाहीत. एखाद्या चित्रपटाचे दुर्दैव किती आणि कसे असू शकते ते हे असे.

दिग्दर्शक Bhappi Soni यांची वाटचाल तशी मोठी. दिग्दर्शक Raj Khosla यांच्याकडे ‘मिलाप’ (१९५५), ‘सी. आय. डी.’ (१९५६), ‘सोलवा साल’ (१९५८) या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वाटचाल करीत मग स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकले. पहिला चित्रपट ‘एक फूल चार काटे’ (१९६०). त्यानंतर ‘जानवर’ (१९६५), ‘ब्रह्मचारी’ (१९६८), ‘प्यार ही प्यार’ (१९६९), ‘एक श्रीमान एक श्रीमती’ (१९६९), ‘तू हंसी मैं जवान’ (१९७०), ‘प्रीतम’ (१९७१), ‘जवा मोहब्बत’ (१९७१), ‘झील के उस पार’ (१९७३), ‘भंवर’ (१९७६) असे चित्रपट दिग्दर्शित करीत ‘चलता पुर्जा’ पडद्यावर आला. पण त्यानंतर आणखी काही चित्रपट दिग्दर्शित केले, मात्र त्यांचा भर ओसरला होता. Shammi Kapoor, Dharmendra, Vyjayanthimala, Mumtaz अशा बड्या स्टार्ससोबत चित्रपट दिग्दर्शित केलेल्या Bhappi Soni यांना Rajesh Khanna यांच्या लहरीपणाचा आणि पडत्या काळाचा फार फार फटका बसला. ‘चलता पुर्जा’ नावाचा चित्रपट पडद्यावर आला आहे हे Rajesh Khanna यांच्या चाहत्यांना तरी आठवतेय का? ४९ वर्षे झाली हो.

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/rajesh-khanna-movie-named-chalta-purja-story/




Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….