Vyjayanthimala : यशाची हॅटट्रिक तरी वैजयंतीमालाने चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत केले….

आपण ऐन भरात असताना थांबण्याचा निर्णय घेणं चित्रपटाच्या जगात जवळपास अशक्यप्राय गोष्ट. चित्रपटसृष्टीत आपण वरच्या स्थानावर आहोत, पैशाची बॅग घेऊन बडे बडे निर्माते साईन करायला तत्पर आहेत, दिग्दर्शक पटकथा घेऊन सेटवर निघालेत, वितरक चढ्या किमतीत या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे हक्क घ्यायला तयार आहेत, फिल्म दीवाने आगाऊ तिकीट विक्रीसाठी लांबलचक रांगेत उभे राहून तिकीट काढण्यासाठी धडपडताहेत, फिल्म मॅगझिनच्या मुखपृष्ठावर आकर्षक देखणी छबी झळकतेय, गाॅसिप्स मॅगझिनमधून असलेलं नसलेलं लफडे शिजवले जातेय, असं सगळं हवंहवंसं वाटतं असलेलं असूनही चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत करावं? येड लागले की काय? वैजयंतीमालाने ते केलं. आणि आपल्या या ठाम निर्णयापासून अजिबात फिरकत घेतली नाही. कमालीचा संयम ठेवला. H. S. Rawail दिग्दर्शित Sangharsh (१९६८) हा Dilip Kumar सोबतचा चित्रपट‌ साधारण यशस्वी ठरला, पण Rajaram आणि Satish Wagle निर्मित आणि Bhappi Sonie दिग्दर्शित Pyar Hi Pyar (१९६९) हा Dharmendraसोबतचा, F. C. Mehra निर्मित आणि Lekh Tandon दिग्दर्शित Prince (१९६९) हा Shammi Kapoorसोबतचा चित्रपट आणि Naresh Kumar निर्मित आणि दिग्दर्शित Ganwaar (१९६९) हा Rajendra Kumarसोबतचा चित्रपट, अशी रौप्य महोत्सवी यशाची हॅटट्रिक साधली तरीही वैजयंतीमालाने Dr. Bali यांच्याशी लग्न करून चैन्नईत (तेव्हाचे Madras) वास्तव्य करणे पसंत केले.

Vyjayanthimala साठच्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील नंबर एकची अष्टपैलू अभिनेत्री. सौंदर्य, अभिनय, नृत्य आणि जबरा आत्मविश्वास ही तिची केमिस्ट्री. त्या काळातील Dilip Kumar, Raj Kapoor आणि Dev Anand या त्रिमूर्तीप्रमाणेच Rajendra Kumar, Shammi Kapoor, Sunil Dutt, Dharmendra अशा आघाडीच्या सर्वच नायकाची ती नायिका होती. मला वाटतं, वैजयंतीमालाने योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच्या काळात म्हणजे सत्तरच्या दशकात पुनरागमनासाठी आलेल्या ऑफर तिने स्वीकारण्याचा मोह टाळला. ये जमणे कसोटीचे असते.चित्रपटसृष्टी सोडताना वैजयंतीमालाने Rajdutt दिग्दर्शित Zhep (१९७१) या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात Dr. Kashinath Ghanekar, Sharad Talwalkar, Darshana, Ramesh Deo, Madhu Apte, Prabhakar Panshikar इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत.

असो. Hema Maliniचे आगमन झाले आहे तेव्हा आपण थांबलेलं बरं असा Vyjayanthimalaने विचार केला असेल तर तो योग्यच होता. हेमा मालिनीच्या आगेमागे Babita, Leena Chandavarkar, Rekha, Rakhee, Jaya Bhaduriचे आगमन झाले, यात आपलं स्थान ते काय असणार? तर चरीत्र भूमिका. त्यापेक्षा थांबावे हे उत्तम. Rajesh Khannaचे युग अवतरले होते आणि त्याची नायिका म्हणून वैजयंतीमाला अजिबात शोभली नसती. अशी समज असणे, येणं आवश्यक असते. काही अभिनेत्रीना ती आली नाही आणि त्यांचेच हंस झाले. (१९९४ साली Srideviने Aamir Khanसोबत फोटो सेशन करुन काय साधलं?) वैजयंतीमाला आपल्या संसारात रमली. सत्तरच्या दशकातील आम्हा चित्रपट रसिकांना मॅटीनी शोला तिची भूमिका असलेले Ganga Jamuna, Naya Daur, Sangam, Jewel Thief, Leader असे चित्रपट पाह्यला मिळाले.

आपले फिल्मवाले गप्प बसतील तर ना? Deewar (१९७५) साठी कलाकारांची निवड होत होत गेली याची फार रंजक कथा दंतकथा आहे. या चित्रपटातील आई अर्थात मा खूप महत्वाची व्यक्तीरेखा आहे हे तुम्हालाही माहित्येय. आणि ही भूमिका Vyjayanthimalaने साकारावी यासाठी चित्रपटाचे निर्माते Gulshan Rai आणि दिग्दर्शक Yash Chopra थेट Chennai येथे गेले. त्यांना वाटलं, मध्यवर्ती भूमिका आहे, वैजयंतीमाला नक्कीच हो म्हणणार. पण आपण चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा घेतलेला निर्णय बदलणार नाही असे तिने निक्षून सांगितले. तिने दीवार स्वीकारला असता तर आणखी एक चित्रपट ऑफर झाला असता. यश चोप्रा यांना Trishul (१९७८) वेळी पुन्हा एकदा वाटलं, वैजयंतीमाला आईच्या भूमिकेत असावी. वैजयंतीमालाने पुन्हा एकदा नकार दिला. Manoj Kumar यांना वाटलं, आपल्याला तरी वैजयंतीमाला नकार नक्कीच देणार नाही, तिने Kranti (१९८१) या चित्रपटालाही नकार दिला आणि चित्रपटसृष्टीत न परतण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. असं असले तरी राजकारणात मात्र प्रवेश केला आणि १९८४ साली दक्षिण चैन्नई लोकसभा मतदारसंघातून Indira Congressच्या खासदार म्हणून विजय मिळवला….तोही तिनदा.

त्यानंतर अनेक वर्षांनी जुहू येथील B. R. Chopra यांच्या बंगल्यातील मिनी थिएटरमध्ये त्यांनी दिग्दर्शित Naya Daur हा मूळ कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपट आता रंगीत करण्यात आला म्हणून आम्हा काही सिने पत्रकारांसाठी खास खेळाचे आयोजन करण्यात आले असता Vyjayanthimala यांची यावेळी खास उपस्थिती होती. एव्हाना काळ बराच पुढे गेला होता आणि वैजयंतीमालाचे दिसणेही… वाढतं वय दिसत होते. वैजयंतीमालाने भूमिका साकारलेला शेवटचा चित्रपट Ganwaar ५ जून १९७० रोजी प्रदर्शित झाला, त्याला तब्बल पंचावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत… तरीदेखील वैजयंतीमाला आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर स्टारच आहे. असे स्टार, सुपर स्टार‌ रिलच्या युगात खरंच निर्माण होतील काय?

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/even-after-a-hat-trick-of-success-vyjayanthimala-chose-to-step-away-from-the-film-industry/



Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….