Hrishikesh Mukherjee : ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘आशीर्वाद’
काही चित्रपट जबरदस्त कथानक घेवून आलेले असतात. त्यातील कलावंतांचा अभिनय अतिशय वरच्या दर्जाचा असतो. एवढेच नाही तर आशा चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार प्राप्त होतो पण व्यावसायिक पातळीवर या सिनेमाला अजिबात यश मिळत नाही. (Hrishikesh Mukherjee)
Hrishikesh Mukherjee दिग्दर्शित Aashirwad हा 1968 साली प्रदर्शित झालेला सिनेमा याच कॅटेगिरीत मोडतो. ‘आशीर्वाद’ हा केवळ एक चित्रपट नसून, मानवी नात्यांच्या अथांग शोकांतिकेचे एका बापाच्या डोळ्यांतून टिपलेले अत्यंत तरल आणि हृदयद्रावक महाकाव्य आहे. ऋषिकेश मुखर्जी यांनी सरंजामशाहीची क्रूरता, सामाजिक विषमता आणि त्या सगळ्यात होरपळून निघणाऱ्या एका हळव्या कवी मनाच्या पित्याचे दुःख पडद्यावर असे काही साकारले आहे, की तो पाहताना प्रेक्षकांचे काळीज प्रत्येक दृश्यागणिक पिळवटून निघते. या चित्रपटाचा आत्मा पूर्णपणे Ashok Kumar यांच्या बहुरूपी, विलक्षण आणि मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनयावर आणि Vasant Desai यांच्या संगीतावर आधारीत आहे. अशोक कुमार यांच्या स्वरातील Rail Gaadi Rail Gaadi हे रॅप सॉंग (गीतकार- Harindranath Chattopadhyay) या चित्रपटात होते तसेच Manna Dey यांच्या स्वरातील Jeevan Ke Lambe Ye Raste फारच भावस्पर्शी होते! (Hrishikesh Mukherjee)
सिनेमातील इतर सर्व गाणी Gulzar यांनी लिहिली होती. चित्रपटाचे कथानक Anil Ghosh यांचे होते तर चित्रपटाची पटकथा आणि संवाद गुलजार यांचे होते! शिवनाथ चौधरी (अशोक कुमार) ऊर्फ ‘जोगी ठाकूर’च्या भूमिकेत दादामोनींनी अभिनयाचे जे नानाविध रंग दाखवले, ते भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एका सुवर्णअध्यायासारखे आहेत. कथेच्या सुरुवातीला आपल्या हट्टी आणि क्रूर जमींदार पत्नीच्या (Veena) अत्याचाराने गांजलेला, तरीही गावातील गरीब, पददलितांबद्दल अतोनात कणव बाळगणारा अगतिक पती त्यांनी ज्या संयमाने उभा केला, तिनेच कथेची भावनिक पायाभरणी होते. आपल्या जिवाचा तुकडा असलेल्या लहानग्या मुलीवर वर अपार प्रेम करणारा हा बाप जेव्हा पत्नीच्या जुलूमाविरुद्ध बंड पुकारतो आणि स्वतःच्या तत्त्वांसाठी घराचा उंबरठा ओलांडतो, तो प्रसंग कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. पोटच्या लेकीला कायमचे सोडून जाताना शिवनाथच्या पाठीवर पडलेले विरहाचे अदृश्य ओझे Ashok Kumar यांनी आपल्या संथ पाऊलवाटेतून आणि झुकलेल्या खांद्यातून शब्दशः जिवंत केले आहे. (Hrishikesh Mukherjee)
यानंतर मुंबईच्या पार्कमध्ये लहान मुलांचा लाडका सखा बनून “रेल गाडी रेल गाडी” आणि “नाव चली” गाणारा जोगी ठाकूर कमालीचा निरागस आणि उत्साही वाटतो. वरवर अत्यंत आनंदी दिसणाऱ्या या अभिनयाच्या मागे अशोक कुमारने एक छुपं कारुण्य दडवून ठेवलं आहे; मुलांच्या त्या हसऱ्या दुनियेत रमणारा जोगी ठाकूर प्रत्यक्षात त्या बालकांच्या चेहऱ्यांमध्ये आपली लाडकी बित्तूच शोधत असतो. भारतीय सिनेमातील पहिला ‘रॅपर’ म्हणून या गाण्यातील त्यांची लयबद्धता जितकी अचंबित करते, तितकीच त्यामागील बापाची एकाकी धडपड मनाला चटका लावून जाते. (Hrishikesh Mukherjee)
पण नियतीचा क्रूर खेळ इथेच थांबत नाही. एका असहाय्य मुलीची अब्रू वाचवताना अपघाताने झालेल्या हत्येचा आरोप स्वतःवर घेऊन शिवनाथ जेव्हा तुरुंगाची काळी कोठडी पत्करतो, तेव्हा दादामुनींचा अभिनय एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो. उत्तरार्धात, तुरुंगात खितपत पडलेला हा म्हातारा, खचलेला पण आत्मसन्मान जपणारा कैदी पाहून डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. त्यातच जेव्हा त्यांना समजते की त्यांची मोठी झालेली मुलगी नीना आता गुन्हेगारांचा कमालीचा तिरस्कार करते, तेव्हा पोटच्या लेकीसमोर “मीच तुझा बाप आहे” हे सांगू न शकणारा, स्वतःची ओळख आणि चेहरा तिच्यापासून लपवण्यासाठी कमालीची तगमग करणारा एक लाचार पिता दादामुनींनी ज्या ताकदीने आणि आर्ततेने उभा केला, त्याला जागतिक सिनेमात तोड नाही. (Hrishikesh Mukherjee)
या चित्रपटाची भावनिक तीव्रता पराकोटीला नेण्यात Lata Mangeshkar यांच्या दोन अप्रतिम आणि अजरामर गाण्यांचा सिंहाचा वाटा आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धात जेव्हा लतादीदींच्या सुरांमध्ये Ek Tha Bachpan, Chhota Sa Sawan हे गाणे गुंजते, तेव्हा ते केवळ एक पार्श्वगीत उरत नाही, तर ते बाप-लेकीच्या नात्यातील सुवर्णकाळाचे आणि पुढे येणाऱ्या विरहाचे एक अत्यंत कातर, व्याकुळ करून सोडणारे प्रतीक बनते. लतादीदींच्या आवाजातील तो आर्तपणा आणि ऋषिकेश मुखर्जींचे दिग्दर्शन मिळून प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतात. लतादीदींच्याच आवाजातील Jhir Jhir Barse Sawan Aankhiya हे गौड मल्हार रागावर आधारीत गीत नायिका सुमित्रा संन्याल आणि Sanjeev Kumar यांच्या मुग्ध प्रेमाचे दर्शन देते. (Hrishikesh Mukherjee)
चित्रपटाचा अंतिम प्रसंग तर मूक अभिनयाचा आणि मानवी भावभावनांचा सर्वोच्च कळस आहे. मृत्यूच्या दारात उभा असलेला, कमालीचा आजारी असलेला हा म्हातारा बाप, आपल्या मुलीच्या सुखा आड आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी येऊ नये म्हणून, स्वतःची ओळख लपवून दूरवरूनच तिच्या लग्नाच्या मांडवात डोकावतो. ते थरथरणारे हात, डोळ्यांतील अथांग कारुण्य, आसवांनी भिजलेला चेहरा आणि लेकीला सुखात पाहून चेहऱ्यावर उमटलेले कमालीचे तृप्त भाव… Ashok Kumar यांनी या प्रसंगात अभिनयाची अशी काही परिसीमा गाठली आहे की तिथे शब्दांची गरजच उरत नाही. पार्श्वभूमीत Manna Dey यांच्या आवाजातील Jeevan Se Lambe Hain Bandhu, Ye Jeevan Ke Raste हे गाणे वाजत असताना हा महात्यागी बाप शांत होतो. ‘Aashirwad‘ हा चित्रपट म्हणजे केवळ एका राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे प्रदर्शन नाही, तर एका पित्याने आपल्या लेकीच्या स्वाभिमानासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य, नाव आणि अस्तित्व राखेत मिळवून दिलेल्या एका अथांग, निस्सीम त्यागाचे अत्यंत भावुक आणि अजरामर महाकाव्य आहे. आज 27 ऑगस्ट ऋषिकेश मुखर्जी यांची पुण्यतिथि. त्या निमित्ताने त्यांच्या एका अजरामर कलाकृतीची ओळख! (Hrishikesh Mukherjee)
The original blog is posted at Kalakruti Media. To read more, click here - https://kalakrutimedia.com/hrishikesh-mukherjee-hrishikesh-mukherjees-aashirwad/

Comments
Post a Comment