Parikshit Sahni : अभिनेता परीक्षितच्या आयुष्याला कलाटणी देणारा ‘तो’ रशियातील किस्सा!
माणसाच्या आयुष्यात कधी कधी अशा काही अकल्पित घटना घडतात की, ज्यामुळे त्याच्या संपूर्ण जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही बदलून जाते. असाच काहीसा नाट्यमय आणि विचार करायला लावणारा प्रकार घडला होता हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते Parikshit Sahni यांच्याबाबत. आज आपण Parikshit Sahni यांना भारतीय सिनेमातील एक अत्यंत सुसंस्कृत, ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखतो. पण जर ६० च्या दशकात रशियामध्ये त्यांची भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित Jawaharlal Nehru यांच्याशी भेट झाली नसती, तर कदाचित ते कधीच भारतात परतले नसते आणि आपण एका उत्कृष्ट कलाकाराला मुकलो असतो. पंडित नेहरूंच्या त्या एका भेटीने आणि त्यांनी दिलेल्या डोसने परीक्षित यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला. हा किस्सा स्वतः Parikshit Sahni यांनी अनेक मुलाखतींमध्ये आणि आपल्या पुस्तकात आवर्जून सांगितला आहे. (Parikshit Sahni)
हा किस्सा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे भूतकाळात जावे लागेल. Parikshit Sahni हे भारतीय सिनेसृष्टीतील दंतकथा असलेले महान अभिनेते Balraj Sahni यांचे सुपुत्र. वडील एवढे मोठे अभिनेते असूनही सुरुवातीला परीक्षित यांना अभिनयात काडीचाही रस नव्हता. त्यांना आर्किटेक्ट व्हायचे होते. मुलाची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी Balraj Sahni यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी थेट रशियाला (तेव्हाचा सोव्हिएत युनियन) पाठवले. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. गणितात कमी गुण मिळाल्यामुळे परीक्षित यांचा आर्किटेक्चरचा नंबर हुकला. आता पुढे काय? हा प्रश्न असतानाच, वडील बलराज सहानी यांनी सुचवले की, आर्किटेक्चर नाही तर नाही, रशियात राहून सिनेमाचा Film Making अभ्यासक्रम पूर्ण कर. वडिलांचा सल्ला मानून Parikshit Sahni यांनी मॉस्कोमधील विख्यात फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सिनेमा हा विषय निवडला आणि तब्बल ६ वर्षांचा कडक अभ्यासक्रम सुरू केला. या काळात त्यांनी चित्रपट निर्मितीच्या सर्व तांत्रिक आणि कलात्मक बाबींचा गांभीर्याने अभ्यास केला. रशियात राहत असताना त्यांना तिथले समृद्ध साहित्य, संस्कृती, रशियन संगीत आणि नाटक यांचे प्रचंड वेड लागले. ते रशियन संस्कृतीच्या प्रेमात इतके पडले की, कोर्स पूर्ण झाल्यावर आपण भारतात न जाता आयुष्यभर रशियातच स्थायिक व्हायचे आणि तिथेच करिअर करायचे, असा पक्का निर्णय त्यांनी मनाशी घेतला. (Parikshit Sahni)
त्याच काळात, भारताचे पंतप्रधान पंडित Jawaharlal Nehru हे रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर येणार होते. ६० च्या दशकात पंडित नेहरूंची क्रेझ केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात होती. तरुण Parikshit Sahni यांच्या मनातही नेहरूंबद्दल कमालीचे आकर्षण आणि आदर होता. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना डोळे भरून पाहता यावे, म्हणून परीक्षित मॉस्कोच्या विमानतळावर पोहोचले. विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था होती, रशियन पोलिसांचा कडा पहारा होता. पण डोक्यात तरुणाईची मस्ती आणि उत्साह असल्यामुळे परीक्षित यांनी रशियन सिक्युरिटीला गुंगारा दिला आणि ते थेट पंडित नेहरूंच्या व्ही.आय.पी. गराड्यात घुसले. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट पुढे होऊन पंडितजींशी हस्तांदोलन केले. (Parikshit Sahni)
सुरक्षा व्यवस्थेचा हा भंग रशियन पोलिसांना अजिबात आवडला नाही. त्यांनी सुरक्षेचा गंभीर प्रश्न मानून परीक्षित यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि स्थानबद्ध केले. एका भारतीय विद्यार्थ्याला रशियन पोलिसांनी पकडल्यामुळे गोंधळ उडाला, पण नंतर परीक्षित यांनी आपली चूक मान्य करत लेखी माफी मागितली आणि नेहरूंचे फॅन असल्यामुळे असे घडल्याचे सांगितले, तेव्हा कुठे पोलिसांनी त्यांची सुटका केली. विमानतळावरील त्या गदारोळानंतर दुसऱ्या दिवशी पंडित नेहरूंनी रशियात शिकणाऱ्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांसाठी एका विशेष भेटीचे आयोजन केले होते. त्या काळात अनेक भारतीय तरुण उच्च शिक्षणासाठी रशियात जात असत. नेहरूंनी सर्व विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने संवाद साधायला सुरुवात केली. Parikshit Sahni सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे रशियन शिक्षकानी पंडित नेहरूंची वैयक्तिक भेट घेतली आणि सांगितले की, “भारतातील प्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी यांचा मुलगा परीक्षित इथेच सिनेमाचा अभ्यास करत आहे.” आपल्या जुन्या मित्राच्या मुलाचे नाव ऐकून नेहरूंच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. त्यांनी परीक्षित यांना जवळ बोलावले. (Parikshit Sahni)
त्यावेळी Parikshit Sahni यांचे वय अवघे २०-२२ वर्षे होते. डोक्यात परदेशात राहण्याची हवा आणि तरुणाईची नशा होती. पंडितजींनी पाठीवर हात ठेवत प्रेमाने विचारले, “तरुण मित्रा, अभ्यास पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचा विचार आहे? भारतात कधी परतणार?” त्यावर परीक्षित अत्यंत आत्मविश्वासाने आणि काहीशा उद्धटपणे म्हणाले, “पंडितजी, मी भारतात परतणार नाहीये. मी इथेच रशियात राहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात असे काय आहे, ज्याच्यासाठी मी तिथे यावे? मी इथे खूप सुखात आहे, मला इथली संस्कृती आवडते आणि मी इथेच माझे करिअर करणार आहे.” हा जवाब ऐकताच पंडित नेहरूंचा चेहरा रागाने लालबुंद झाला. आपल्याच देशाच्या एका तरुणाने मातृभूमीबद्दल असा अनादर दाखवावा, हे देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या नेहरूंना सहन झाले नाही. ते प्रचंड संतापले आणि रागात परीक्षित यांच्या रशियन शिक्षकाकडे वळत म्हणाले, “बरोबर आहे… हा परीक्षित म्हणतोय तेच खरे आहे! आम्हीच सगळे मूर्ख होतो! आम्ही कशाला बॅरिस्टरची पदवी घेतल्यानंतर भारतात परत आलो? महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेत एवढे सुखात होते, ते तरी कशाला भारतात आले? आणि याचे वडील बलराज सहानी… ते लंडनमध्ये BBC ची सुखाची नोकरी सोडून भारतात कशाला परत आले? या पोराने कधी या गोष्टीचा विचार केला आहे का?” नेहरूंचा राग एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी परीक्षित यांच्या डोळ्यात डोळे घालून खडे बोल सुनावले, “लक्षात ठेव तरुण मित्रा, आपला देश गरीब असेल, तिथे सोयीसुविधा नसतील, पण ती तुमची मातृभूमी आहे! मातृभूमी म्हणजे आपली आई असते. आपली आई कशीही असली, गरिबीत असली, तरी तिला कधी विसरू नका. ती कशी जरी असली तरी तिचे डोळे कायम तुमच्या वाटा पाहत असतात. तिच्या भल्यासाठी, तिला समृद्ध करण्यासाठी तुम्ही तुमच्या मातृभूमीत परत गेले पाहिजे.” (Parikshit Sahni)
पंडित नेहरूंचा स्वभाव असा होता की, त्यांचा राग जितक्या वेगाने वर चढायचा, तितक्याच वेगाने तो शांतही व्हायचा. Parikshit Sahni लहान आहेत हे समजून घेऊन नेहरूंनी क्षणभरात आपला राग गिळला आणि अत्यंत मायेने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले, “भारताला सध्या तुझ्यासारख्या सुशिक्षित तरुणांची आणि तंत्रज्ञांची गरज आहे. तिथेही सिनेमा क्षेत्रात खूप वाव आहे. तुझी सेवा तुझ्या देशाला मिळायला हवी.” हा छोटासा संवाद संपवून पंडित नेहरू निघून गेले, पण ते परीक्षित सहानी यांच्या डोक्यात विचारांचे प्रचंड थैमान घालून गेले. परीक्षित सांगतात की, नेहरूंचे ते शब्द माझ्या काळजाला आरपार भेदून गेले होते. त्या रात्री मला झोप आली नाही. मी एखाद्या भ्रमिष्टासारखा, वेड्यासारखा रात्रभर मॉस्कोच्या गोठवणाऱ्या थंडीत रस्त्यांवर भटकत राहिलो. मनात नेहरूंचे तेच वाक्य घुमत होते- ‘मातृभूमी म्हणजे आपली आई असते!’ त्या एका रात्रीत परीक्षित सहानी यांचे विचार पूर्णपणे बदलले. परदेशात राहून पैसा कमावण्याची त्यांची इच्छा गळून पडली. त्यांनी ठरवले की, आपला देश कसाही असला तरी ती आपली आई आहे आणि तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण तिथेच गेले पाहिजे. अभ्यासक्रम पूर्ण होताच, म्हणजेच १९६६ मध्ये परीक्षित सहानी सर्व रशियन सुखसोयींवर पाणी सोडून भारतात परतले. (Parikshit Sahni)
भारतात आल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन (RK च्या Mera Naam Joker च्या वेळी तो Raj Kapoor चा सहायक दिग्दर्शक होता!) आणि अभिनयात आपले नशीब आजमावले. नायक म्हणून तो फारसा गाजला नाही. पण चरीत्र अभिनेता म्हणून पुढे 3 Idiots, Lage Raho Munna Bhai, PK अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. पंडित नेहरूंनी विमानतळावर आणि सभेत घेतलेली ती भेट परीक्षित यांच्यासाठी केवळ एक प्रसंग नव्हती, तर तो त्यांच्या पुनर्जन्माचा क्षण होता. आज Parikshit Sahni अभिमानाने सांगतात की, जर त्या दिवशी नेहरूंनी मला ते खडे बोल सुनावले नसते, तर आज मी भारतीय चित्रपटसृष्टीचा भाग नसतो. मातृभूमीची ओढ काय असते, हे नेहरूंनी त्यांना त्या दिवशी शिकवले होते! (Parikshit Sahni)
This blog is originally posted on Kalakruti Media - https://kalakrutimedia.com/parikshit-sahni-the-russian-incident-that-changed-actor-parikshits-life/






Comments
Post a Comment