Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg Boss Marathi च्या एक्स स्पर्धक Trupti Desai यांची पोस्ट व्हायरल
सध्या बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi 6) च्या सहाव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू असताना चौथ्या सीझनमधील स्पर्धक तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या सीझनची आठवण करून देत सध्याच्या स्पर्धकांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचं मानलं जात आहे. तृप्ती देसाईंनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना एक खास प्रसंग शेअर केला आहे. त्या लिहितात, “बिगबॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून “सलमान खान” यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता.” हा किस्सा स्वतः महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मिश्किलपणे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या आठवणीसोबतच त्यांनी त्यांच्या सीझनबद्दल ठाम मत व्यक्त करत लिहिलं आहे की, “आमच्या सिझनसारखी मजा त्यानंतरच्या कोणत्याच सीझनमध्ये अजिबातच नाही हे मात्र तितकच खरं आहे.” (Bigg Boss Marathi 6)
तृप्ती देसाई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये बिग बॉसच्या घराचं स्वरूपही स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मते ते फक्त वाद आणि प्रसिद्धीचं व्यासपीठ नसून एक घर आहे. त्या म्हणतात, “ते घर आहे…. तिथे माणुसकी ,नाती जपणं, टास्क खेळणं, कोणालाही जेवण कमी पडून न देणे हे सर्व सुद्धा पाहणे गरजेचं आहे आणि आम्ही हे सर्व जपण्यात यशस्वी झालेलो होतो.” या विधानातून त्यांनी त्यांच्या सीझनमधील वातावरण अधिक सकारात्मक आणि नात्यांना जपणारं होतं, असं अधोरेखित केलं आहे.त्याबरोबर त्यांनी पुढे अभिमानाने लिहिलं की, “आमचा सीजन संपून तीन वर्ष होऊन गेले परंतु या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाला तो सकारात्मकरित्या लक्षात आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रेमसुद्धा आम्हाला मिळत आहे, आम्ही रीलस्टार म्हणून नाही ‘रियल स्टार’ म्हणून त्या सीजनमध्ये कंटेस्टंट होतो याचा प्रचंड अभिमान आहे.”
सध्या सुरू असलेल्या सहाव्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची संख्या अधिक असल्याने त्यांच्या या विधानाकडे अनेकांनी ‘रील स्टार्स’वर टोला म्हणून पाहिलं आहे. काही चाहत्यांनी त्यांच्या मताला दुजोरा दिला, तर काहींनी सध्याच्या स्पर्धकांचे समर्थन करत प्रत्येक सीझनची शैली वेगळी असते, असं मत व्यक्त केलं. (Bigg Boss Marathi 6)
तृप्ती देसाई यांच्या या पोस्टमुळे ‘रियल स्टार’ विरुद्ध ‘रील स्टार’ असा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचा सध्याचा सीझन जितका घरात रंगतोय, तितकाच तो घराबाहेरही चर्चेचा विषय ठरत आहे.
Read more Marathi Entertainment News at Kalakruti Media.
This articles was originally published on https://kalakrutimedia.com/we-were-not-reel-stars-but-real-stars-ex-bigg-boss-marathi-contestant-trupti-desais-post-goes-viral-info/
Comments
Post a Comment