Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं


 कपिल शर्माचा शो आपण ‘विनोद’ म्हणून पाहतो, त्यातच चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील अनेक वेगळ्या गोष्टी समजतात आणि पूर्वीची चित्रपटसृष्टी कशी होती यावर फोकस पडतो….. अशाच एका एपिसोडमध्ये वहिदा रेहमान सांगत होत्या, के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल ए आझम’ चे बरेचसे चित्रीकरण झालेल्या मोहन स्टुडिओत चक्क टॉयलेट (शौचालय) नव्हते. एका चित्रपटाचे तेथे चित्रीकरण करत असताना माझ्या ते लक्षात आले. ते असावे असे मी आणि मेहमूद यांनी सांगितले. काही दिवसांनी पुन्हा एकदा मोहन स्टुडिओत चित्रीकरणासाठी जाणे झाले असता, टॉयलेटची व्यवस्था केली आहे का असे विचारले असता हो म्हटले. प्रत्यक्षात एका कोपऱ्यात आडोसा केला होता.. वहिदा रेहमान यांच्या या बोलण्याशी आशा पारेख आणि हेलन यांनी दुजोरा दिला. हेलनजी म्हणाल्या, अनेकदा तरी पूर्ण दिवसभर काम केल्यानंतर मग घरी गेल्यावरच टॉयलेटला जाता येई…( सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहायला मिळेल.)

मुंबईतील जुन्या काळातील चित्रपट स्टूडिओच्या कथा अथवा गोष्टी या अशाच आहेत. अनेक प्रकारची गैरसोय असली तरी त्या काळातील चित्रपटसृष्टीने वाटचाल करत करत इतिहास घडवला, समाजातील खालच्या माणसापर्यंत आपला चित्रपट पोहचवला.त्यामागच्या गोष्टी बहुस्तरीय आहेत. ग्लॅमर आणि गाॅसिप्स यांच्या खूप खूप पलिकडच्या आहेत. मी मिडियात आल्या आल्या मुंबईतील चित्रपट चित्रीकरणाचे स्टुडिओ आणि बंगले यातून मनसोक्त मनमुराद भटकंती सुरु केली. वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओपासून चेंबूरच्या आर. के. स्टुडिओपर्यत मुंबईतील सर्वच स्टुडिओत नवीन चित्रपटांचे मुहूर्त, शूटींग रिपोर्टीग, कधी मुलाखतीसाठी जाणं सुरु असतानाच एके दिवशी ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘लाठी’ या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती आले.

१९८७ सालची गोष्ट. या चित्रपटात धर्मेंद्र, माधवी आणि गोविंदा यांच्या प्रमुख भूमिका. ह्रषिकेश मुखर्जी यांनी आपल्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण याच मोहन स्टुडिओत केला असल्याने तो त्यांचा फेवरेट स्टुडिओ. मोहन स्टुडिओत पाऊल टाकताच या वास्तूत पन्नासच्या दशकापासून म्हणजे कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळापासून अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत आले आहे हे पटकन जाणवलं. हा मोहन स्टुडिओ अंधेरी कुर्ला रोडवर होता.

जुन्या काळातील अनेक वास्तू अशा बोलक्या आहेत वा असतात हे मला माझ्या भटकंतीत कायमच जाणवत आले आहे. चित्रपटाच्या जगात तर जुन्या काळातील “स्टुडिओच्या जगात” तर हे प्रामुख्याने जाणवणारे. ‘लाठी’ च्या मुहूर्त दृश्यात एकट्या धर्मेंद्रचा सहभाग होता. ह्रषिकेश मुखर्जी यांच्या ‘सत्यकाम’, ‘अनुपमा’, ‘चुपके चुपके’, ‘चैताली’ या चित्रपटात धर्मेंद्रने भूमिका साकारल्या असल्याने याक्षणी ह्रषिदाना काय हवं आहे हे धर्मेंद्रने पटकन जाणले. या सर्व चित्रपटांतील काही दृश्याचे चित्रीकरण याच मोहन स्टुडिओत झाले. पहिल्या चित्रीकरण सत्रात हा चित्रपट बंद पडला.

मोहन स्टुडिओत बहुचर्चित चित्रीकरण के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल ए आझम’ (१९६०) मधील अतिशय भव्य दिव्य दिमाखदार अशा शीश महलच्या सेटवरील मधुबालाचे अतिशय सदाबहार नृत्य गीत “प्यार किया तो डरना क्या….” हे कलरफुल गाणं. हा भव्य सेट आणि त्यावरचे हे नृत्य चित्रपटाला तब्बल पासष्ट वर्षे झाली तरी त्याचे कौतुक होतेय. कला दिग्दर्शक एम. के. सय्यद यांनी उभारलेल्या या चित्रपटाचे छायाचित्रणकार आर. डी. माथूर आहेत. या शीश महलच्या सेटसाठी लखनौ, फरिदाबाद, आग्रा , कोल्हापूर वगैरे वगैरे ठिकाणांहून आवश्यक त्या अनेक वस्तू आणण्यात आल्या. ही सगळी मेहनत पडद्यावर दिसते. हिंदी चित्रपटातील सर्वोत्तम दहा कला दिग्दर्शनात या सेटचा समावेश होतो.

पूर्वी अनेक चित्रपटांसाठी थीमनुसार आणि प्रसंगानुरूप सेट लावून चित्रीकरण होत असे. मोहन स्टुडिओतही तसे ते झाले. ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद, मिली, नमक हराम, आलाप अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले. देवेंद्र गोयल दिग्दर्शित एक फुल दो माली, दस लाख, एक महल हो सपनो का, चिराग कहा रोशनी कहा,आदमी सडक का, दो मुसाफिर इत्यादी चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले. याच स्टुडिओत ‘देव माणूस’, ‘झेप’, ‘भाग्यवती मी या संसारी’, ‘अधिकार’, ‘जन्म हा तुझ्यासाठी’, ‘दोस्त असावा तर असा’ अशा अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस हा मोहन स्टुडिओ बंद झाला. आज पश्चिम एक्सप्रेस आणि गुंदवली मेट्रो स्टेशनला गेल्यावर या मोहन स्टुडिओची हमखास आठवण येते. मुंबईतील जुन्या काळातील असे अनेक चित्रपट स्टुडिओ काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यात हादेखील एक स्टुडिओ आहे.

This blog was originally published on https://kalakrutimedia.com/mughal-e-azam-and-mohan-studio/
Read more Marathi entertainment news at kalakruti media. 

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष