Vinod Khanna : जेव्हा पडद्यावरचा ‘व्हिलन’ बनला आदरणीय ‘सर’!

 

आज ६ ऑक्टोबर. हिंदी सिनेमाचा हँडसम अभिनेता Vinod Khanna यांचा जन्म दिन. त्या निमित्ताने त्याच्या एका सिनेमाची आठवण! सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेमाकडे आपण जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. हे दशक Rajesh Khanna आणि Amitabh Bachchan या दोघांनी व्यापून टाकले असले, तरी या काळात रुपेरी पडद्यावर झालेले बरेच नवीन प्रयोग दुर्दैवाने सुपरहिट सिनेमांच्या भाऊगर्दीत हरवून गेले. प्रेक्षकांपासून हे सिनेमे थोडेसे मागे राहिले आणि समीक्षकांनीही त्यांच्यावर फारशी चर्चा केली नाही. त्यामुळे हे सिनेमे तसे दुर्लक्षितच राहिले. (Vinod Khanna)

आज अशाच एका विशेष चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. १९७४ साली दिग्दर्शक Madan Sinha यांनी Imtihan हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या चित्रपटात Vinod Khanna आणि Tanuja प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा ख्यातनाम लेखक E. R. Braithwaite यांनी १९५९ साली लिहिलेल्या To Sir with Love या कादंबरीवर आधारित होता. जगभरातील सर्व प्रमुख भाषांत ही साहित्यकृती भाषांतरित झाली आहे. भारतातील शाळांमधूनही या कादंबरीवर आधारित धडा अभ्यासाला होता. E. R. Braithwaite यांच्या याच आत्मचरित्रात्मक कादंबरीवर आधारित १९६७ साली To Sir with Love हा इंग्रजी सिनेमा आला होता. आज जे वाचक साठ वर्षांवरील आहेत, त्यांनी नक्कीच हा चित्रपट पाहिला असणार! Imtihan चित्रपटाचा प्लॉट साधारणतः याच कथानकावर बेतलेला आहे. कॉलेज लाईफवर आपल्याकडे असे फुल-लेंथ चित्रपट कमी आहेत. या चित्रपटात नायक-नायिका कॉलेजमधील विद्यार्थी नाहीत; तर अभिनेता Vinod Khanna याने या चित्रपटात प्रोफ़ेसरची भूमिका केली आहे! अतिशय परिपक्व, धीरगंभीर आणि अभ्यासू प्रोफेसर! Vinod Khanna यांच्या एकूणच चित्रपट कारकिर्दीत ही भूमिका खरोखरच अप्रतिम होती. कारण या चित्रपटापूर्वी विनोद खन्नांचे आगमन रुपेरी पडद्यावर पाच वर्षांपूर्वी (१९६९- Mome Ki Gudiya) झाले असले, तरी त्यांची सुरुवात मुख्यत्वे खलनायकाच्या भूमिकांतून झाली होती. सुरुवातीची तीन-चार वर्षे विनोद खन्नांनी व्हिलनच्या भूमिका केल्या. परंतु १९७३-७४ मधील Gulzar यांच्या Achanak आणि मदन सिन्हा यांच्या Imtihan या चित्रपटांमुळे त्यांच्या कारकिर्दीतील नायकाच्या भूमिकांना खरी सुरुवात झाली. (तसा नायक म्हणून ते यापूर्वीही Hum Tum Aur Woh आणि Anndata या चित्रपटांत आले होते, पण हे सिनेमे फारसे यशस्वी झाले नव्हते.) Imtihan या चित्रपटातील Kishore Kumar यांनी गायलेले Ruk Jana Nahin Tu Kahin Haar Ke हे गाणे आजही कल्ट क्लासिक म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे. (Vinod Khanna)

चित्रपटाचे कथानक हिंदी सिनेमाच्या त्या काळातील पारंपरिक साच्याशी अजिबात न जुळणारे असे होते. अतिशय गर्भश्रीमंत असलेल्या एका उद्योगपतीचा (मुराद) प्रमोद शर्मा म्हणजेच Vinod Khanna हा एकुलता एक मुलगा. परंतु त्याला वडिलोपार्जित श्रीमंतीमध्ये अजिबात रस नसतो. त्याला त्याच्या स्वतःच्या ज्ञानाच्या माध्यमातून पुढे जायचे असते. लोकांच्या श्रमातून मिळवलेल्या पित्याच्या संपत्तीचा त्याला एकप्रकारे तिटकारा असतो. त्यामुळे तो वडिलांच्या संपत्तीचा त्याग करून एका महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारतो. घर सोडताना वडिलांशी त्याचे वाद होतात. “अपने कारोबार में दस हजार लोग काम करते हैं और तू मामूली तीन सौ रुपये (त्या काळातील प्रोफेसरचा पगार!) की नौकरी के लिए घर छोड़ रहा है?” असा त्यांचा प्रश्न असतो. पण आदर्शवादी विचारांच्या प्रमोदला संपत्तीचा मोह नसतो; तो घर सोडतो. (Vinod Khanna)

महाविद्यालयात आल्यावर सुरुवातीला त्याच्या डोळ्यांत विद्यार्थ्यांना घडवण्याची, त्यांना मोठे करण्याची खूप स्वप्ने असतात. पण सुरुवातीच्या काही दिवसांतच त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो; कारण महाविद्यालयातील विद्यार्थी अतिशय बेशिस्त असतात. रोजच्या मारामाऱ्या, मुलींची छेडछाड, गुंडगिरी आणि प्राध्यापकांची टिंगल उडवणे असले प्रकार राजरोसपणे सुरू असतात. सुरुवातीला हतबुद्ध होऊन तो सर्व प्रकार पाहत राहतो, प्रसंगी मुलांशी वाद घालतो आणि व्यवस्थापनाशीही बोलतो; पण एकूण सिस्टीमच चुकीची आहे हे त्याच्या लक्षात येते. खूप विचार केल्यानंतर त्याला जाणवते की या मुलांना वेगळ्या पद्धतीच्या शिक्षणाची गरज आहे. ते ज्या सामाजिक स्तरातून आले आहेत आणि ज्या वातावरणात वाढले आहेत, तिथेच समस्येचे मूळ आहे. त्यामुळे त्यांना प्रेमाने समजून घेण्याचे तो ठरवतो. (Vinod Khanna)

इथे मी Imtihan या चित्रपटापाशी थोडे थांबतो. कारण इथवर हा सिनेमा मूळ कादंबरी आणि इंग्रजी चित्रपटाच्या ट्रॅकवर प्रवास करतो, पण पुढे मात्र तो थोडा बदलताना दिसतो. मूळ इंग्रजी चित्रपटात तो शिक्षक (Sidney Poitier) कृष्णवर्णीय दाखवला आहे. तो चित्रपट दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील आहे, जेव्हा जगभरात वंशवाद उफाळून आला होता. हा शिक्षक मूळचा इंजिनिअर असतो, पण दुसऱ्या महायुद्धानंतर तो बेरोजगार होतो. इंजिनिअरिंगमध्ये जॉब मिळत नाही म्हणून तो लंडनमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारतो. या शाळेतही त्याला वंशभेदाला सामोरे जावे लागते. शाळेतील विद्यार्थी अतिशय बेशिस्त असतात; इतर शाळांतून गुंडगिरीमुळे काढून टाकलेले सगळे विद्यार्थी तिथे जमा झालेले असतात. मारामाऱ्या, टगेगिरी आणि मुलींची छेडछाड हा त्यांचा रोजचाच प्रकार असतो. सिडनी त्यांना सुधारायचे ठरवतो. सुरुवातीला त्याच्या बाजूने कोणीही नसते. ही मुले काय सुधारणार असाच सर्वांचा प्रश्न असतो; पण तो हे आव्हान स्वीकारतो. मुलांशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधतो, क्वचित त्यांचा मित्र बनतो आणि ते असे का बनले याचा मानसशास्त्रीय दृष्टीने विचार करतो. तो मुलांना स्वतःबद्दलचा आदर वाढवायला शिकवतो, मुलींशी आदराने कसे बोलायचे ते सांगतो. हसत-खेळत संवाद साधत तो मुलांना शेक्सपिअर वाचायला शिकवतो. शेवटी सर्व सुरवंटांची फुलपाखरे करण्यात तो यशस्वी होतो आणि त्याचे मिशन संपते. तो शाळेतून जाताना ती मुले गहिवरतात आणि त्याला फेअरवेल कार्ड देतात – To Sir with Love…. या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शन James Clavell यांनी केले होते आणि साठच्या दशकातील पॉप सिंगर Lulu हिने गायलेले टायटल साँग आजही रसिकांच्या लक्षात आहे. (Vinod Khanna)


आता आपण आपल्या मूळ Imtihan या हिंदी चित्रपटाकडे वळूया. विनोद खन्ना आपले मिशन हाती घेऊन कामाला लागतात, पण त्याच वेळी कथानकात कौटुंबिक आणि नाट्यमय वळण येते. महाविद्यालयाचे प्राचार्य (Abhi Bhattacharya) यांची मुलगी मधू (Tanuja) ही खूप दुःखी दाखवली आहे. ज्या मुलावर तिचे प्रेम असते, त्याचा एका विमान अपघातात मृत्यू झाल्यामुळे तिचे आयुष्य दुःखात बुडालेले असते. Vinod Khanna तिच्या आयुष्यात येतात, तिला समजावून सांगून पुन्हा नवीन स्वप्ने दाखवतात आणि दुःखाच्या खाईतून बाहेर काढतात. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलू लागते आणि ती पुन्हा पेंटिंग करायला सुरुवात करते. विनोद तिच्या आयुष्याला नवा आयाम देतात; तनुजाने ही भूमिका अतिशय अप्रतिमरीत्या वठवली आहे. (Vinod Khanna)

दुसरीकडे महाविद्यालयात रीटा (Bindu) ही विद्यार्थिनी चेअरमनची मुलगी असते. ती प्रोफेसर विनोद खन्नांवर एकतर्फी प्रेम करत असते. पैशाने सर्व काही विकत घेता येते असा उद्धट भाव तिच्या वागण्यात असतो. विनोद खन्ना सर्वतोपरी तिला त्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला देतात. एकदा महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान रात्री बिंदू Vinod Khanna च्या खोलीत जाते. तो जेव्हा तिला दूर करतो, तेव्हा ती त्याच्यावर बळजबरीचा आरोप करून कांगावा सुरू करते. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि मॅनेजमेंट विनोद खन्नांच्या विरोधात उभे ठाकतात. केवळ तनुजाला त्यांच्या निर्दोषत्वाची खात्री असते. ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी गुंडप्रवृत्तीपासून दूर करून सुसंस्कारित बनवले, तोच शिक्षक आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असतो! पण शेवटी ‘दूध का दूध पानी का पानी’ होते आणि विनोद खन्ना या आरोपातून निर्दोष बाहेर पडतात. ते तनुजाला सोबत घेऊन कॉलेजमधून बाहेर पडतात. सोनं जसे अग्निपरीक्षेनंतर अधिक झळाळून निघते, तसेच त्यांचे मिशन पूर्ण झालेले असते – पण एक मोठा ‘इम्तिहान’ दिल्यानंतर! (Vinod Khanna)

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?