Ajeeb Dastaan Hai Yeh : या गाण्यावर सरकारने चक्क बंदी घातली होती!

 कधी-कधी एखादी कारकूनी चूक (क्लेरिकल मिस्टेक) एखाद्या क्लासिक गाण्याला रेडिओवर प्रसारीत होण्यापासून काही वर्षे वंचित ठेवू शकते! विशेष म्हणजे हे गाणे आज ६५ वर्षांनंतरदेखील अत्यंत लोकप्रिय आहे, पण या गाण्यावर काही काळासाठी रेडिओवर बंदी घालण्यात आली होती. आज या बंदीचे कारण ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल, पण त्या काळातली परिस्थितीच तशी होती. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता तो नेमका किस्सा? (Ajeeb Dastaan Hai Yeh)

किस्सा सांगण्यापूर्वी त्या काळची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे. भारतात १९५२ ते १९६२ या काळात Pandit Jawaharlal Nehru यांच्या मंत्रिमंडळात B. V. Keskar नावाचे एक माहिती आणि प्रसारण मंत्री होते. हे मंत्री महोदय भारतीय संस्कृतीचा अतिरेकी अभिमान बाळगणारे होते. त्यांना थोडे जरी काही संशयास्पद वाटले, की ते लगेच त्यावर बंदी घालत असत. त्यांचा हा फाजील सांस्कृतिक आत्मविश्वास इतका वाढला होता की, १९५२ पासून त्यांनी भारतीय चित्रपटातील गाणी आकाशवाणीवर (रेडिओ) वाजवण्यास पूर्णपणे बंदी घातली होती. लक्षात घ्या, तो काळ भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ होता. एकीकडे Awaara, Albela, Shree 420, Do Aankhen Barah Haath आणि Jhanak Jhanak Payal Baaje यांसारखे म्युझिकल हिट चित्रपट चित्रपटगृहात झळकत होते. रसिक या सिनेमांना प्रचंड गर्दी करत होते, परंतु या सिनेमातील गाणी ऐकण्यासाठी मात्र त्यांना परदेशातील रेडिओचा सहारा घ्यावा लागत असे. तो सहारा होता Radio Ceylon! (Ajeeb Dastaan Hai Yeh)

याच काळात रेडिओ सिलोनवर Binaca Geetmala हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सुरू झाला होता. त्यामुळे भारतीय श्रोत्यांना रेडिओ सिलोनवरील कार्यक्रमांवर अवलंबून राहावे लागत होते, कारण प्रत्येकाला ग्रामोफोन रेकॉर्ड विकत घेणे परवडणारे नव्हते. रेडिओची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती आणि जाहिरातींचा ओघही तिकडेच वळत होता. हे पाहून सरकारला अखेर जाग आली. सरकारने 3 ऑक्टोबर १९५७ रोजी Vividh Bharati ची स्थापना केली आणि भारतात चित्रपट संगीत पुन्हा ऐकू येऊ लागले. असे असले तरी, B. V. Keskar महोदय आपल्या सांस्कृतिक तत्त्वांसोबत तडजोड करायला तयार नव्हते. ते प्रत्येक गाण्याकडे अतिशय चिकित्सकपणे पाहत आणि थोडे जरी उलटसुलट वाटले, की त्या गाण्याला विविध भारतीवर लगेच बॅन करत असत. (Ajeeb Dastaan Hai Yeh)

आता वळूया मूळ किस्स्याकडे. ज्या गाण्यावर मंत्र्यांनी बंदी घातली होती, ते गाणे होते Dil Apna Aur Preet Parai या चित्रपटातील Ajeeb Dastaan Hai Yeh, Kahan Shuru Kahan Khatam. Lata Mangeshkar यांनी गायलेले हे गाणे Shailendra यांनी लिहिले होते, तर संगीत Shankar-Jaikishan यांचे होते. हे गाणे सुरुवातीपासून ऐकले तर त्यात एकही अश्लील शब्द नाही; उलट प्रेमाची एक सात्विक भावना त्यात ओतप्रोत भरलेली आहे. मग या गाण्यावर बंदी का घातली? (Ajeeb Dastaan Hai Yeh)

या बंदीमागचा धांडोळा घेतला तर एक मनोरंजक माहिती पुढे येते. खरं तर मंत्री महोदयांना या गाण्यावर बंदी घालायचीच नव्हे; त्यांना बंदी घालायची होती याच चित्रपटातील दुसऱ्या एका गाण्यावर! ते गाणे होते – लता मंगेशकर यांनीच गायलेले आणि Hasrat Jaipuri यांनी लिहिलेले Sheesha-E-Dil Itna Na Uchhalo. मंत्री महोदयांनी आदेश दिला की, हे गाणे वाजवणे बंद करा. त्या काळात आकाशवाणीकडे ७८ आरपीएमच्या ग्रॅमोफोन रेकॉर्ड असायच्या. या रेकॉर्डवर फक्त दोनच गाणी असत—एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक. ‘Dil Apna Aur Preet Parai‘ या चित्रपटाच्या या रेकॉर्डवर एका बाजूला Ajeeb Dastaan Hai Yeh होते आणि दुसऱ्या बाजूला Sheesha-E-Dil Itna Na Uchhalo हे गाणे होते. मंत्री महोदयांच्या आदेशाची ताबडतोब अंमलबजावणी करण्याच्या घाई गडबडीत त्या विभागाच्या एका क्लर्कने घाई घाईत चुकीच्या बाजूच्या गाण्यावर बॅनचा शिक्का मारला! जे गाणे खरोखर बॅन व्हायला हवे होते, ते न होता सरळ ‘अजीब दास्तां है ये…’ वर बंदी आली. (Ajeeb Dastaan Hai Yeh)

सरकारी कारभार असाच असतो. यावर कुणी फारशी चर्चा केली नाही. परिणामी, हे गाणे आकाशवाणीवर आणि विविध भारतीवर पुढे अनेक वर्षे वाजतच राहिले नाही. अर्थात, ही गोष्ट ना निर्मात्याला कळाली, ना दिग्दर्शकाला, तसेच गायक आणि संगीतकारांनाही ती समजली नाही. याचे कारण म्हणजे रेडिओ सिलोनवर हे गाणे आधीपासूनच गाजत होते, सिनेमा सुपरहिट ठरला होता आणि लोकांकडे ग्रामोफोन रेकॉर्ड आधीपासूनच होते. त्यामुळे या बंदीचा फारसा फटका त्या गाण्याला बसला नाही. (Ajeeb Dastaan Hai Yeh)

==============================

हे देखील वाचा: Musician Jaikishan : एस जे यांच्या रोमँटिक सूरांचा बादशहा!

==============================

दुसरीकडे, Sheesha-E-Dil Itna Na Uchhalo या गाण्यामध्ये केसकर साहेबांना नेमकं काय अश्लील वाटले, हे कोणालाच समजले नाही; पण त्यातील काही शब्द त्यांच्या बुद्धीला कदाचित आक्षेपार्ह वाटले असावेत, म्हणून त्यांनी ते गाणे बॅन ठरवले होते. परंतु, एका क्लार्कच्या चुकीच्या शिक्क्यामुळे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा काहीसा प्रकार घडला. पुढे अनेक वर्षांनी ही खाबुगिरी आणि प्रशासकीय चूक शासनाच्या लक्षात आली आणि त्यांनी अखेर त्या अजरामर गाण्यावरील बंदी उठवली! (Ajeeb Dastaan Hai Yeh)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

THIS BLOG IS ORIGINALY PUBLISHED AT KALAKRUTI MEDIA - https://kalakrutimedia.com/ajeeb-dastaan-hai-yeh-the-song-that-was-banned-by-the-government/

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Ismat Chughtai यांच्या वादग्रस्त कथेवरील ‘लिहाफ’ सिनेमा बघितला का?