IFFI 2026 : जगभरातील सिनेमांचा महोत्सव पुन्हा गोव्यात!

 चित्रपट म्हणजे फक्त दोन-अडीच तासांची गोष्ट नाही, तर जगभरातील वेगवेगळ्या संस्कृती, माणसं, त्यांचे अनुभव, संघर्ष आणि स्वप्नं पडद्यावर पाहण्याची एक संधी असते. आणि हीच संधी घेऊन पुन्हा एकदा गोवा सज्ज झाला आहे, जगभरातील सिनेमांचा उत्सव साजरा करण्यासाठी ! भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असणारा International Film Festival of India अर्थात IFFI यंदा २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोव्यात पार पडणार आहे. यंदाच्या ५७व्या महोत्सवाची Theme आहे – Stories Without Borders! (IFFI 2026)

जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न यंदाच्या IFFI मधून केला जाणार आहे. भाषा, देश, संस्कृती आणि भौगोलिक सीमा ओलांडून कथा सांगण्याची आणि त्या कथा अनुभवण्याची संधी चित्रपटप्रेमींना या महोत्सवातून मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवामध्ये जगभरातील ८६ देशांमधून आलेले १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, जर्मन चित्रपट Fatherland ने महोत्सवाची सुरुवात होणार आहे, तर We Are All Strangers या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. (IFFI 2026)

IFFI मधील सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक म्हणजे Indian Panorama. या विभागामध्ये भारताच्या विविध भाषांमधील आणि संस्कृतींमधील चित्रपटांची निवड केली जाते. यंदा भारतातील १८ भाषांमधील तब्बल ७६ चित्रपट या विभागात प्रदर्शित होणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील वैविध्य, वेगवेगळ्या प्रदेशांतील कथा आणि स्थानिक संस्कृतींचं दर्शन घडवणारा हा विभाग दरवर्षी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण असतो. आणि खासकरून मराठी चित्रपटप्रेमींसाठी तर हा विभाग महत्त्वाचा ठरतो. मराठी चित्रपटांना केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख निर्माण करून देण्यासाठी अशा महोत्सवांची मोठी भूमिका असते. यंदा या विभागामध्ये Aadi Anant, Bapya, Deool Band 2, Tighi, Shiksha, Chandoba आणि Aabhal Vruksha यांसारख्या मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांना महोत्सवात प्रेक्षकांसमोर आपली कथा मांडण्याची संधी मिळणार आहे, शिवाय काही चित्रपट पुरस्कारांच्या स्पर्धेतही सहभागी असणार आहेत. त्यामुळे मराठी सिनेमासाठी यंदाचा महोत्सव निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. (IFFI 2026)

IFFI हा केवळ नवीन चित्रपट पाहण्याचा महोत्सव नसून भारतीय आणि जागतिक सिनेमाच्या इतिहासाचा, त्यातील योगदानाचा आणि सिनेमाला समृद्ध करणाऱ्या कलाकारांचा उत्सवही आहे. यंदाही भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या कामाचा गौरव आणि त्यांच्या योगदानाची आठवण महोत्सवामध्ये करून दिली जाणार आहे. वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास, तिची बदलती शैली आणि तिच्या निर्मितीमागच्या कलात्मक प्रक्रियेचा अनुभव घेता येणार आहे. (IFFI 2026)

आता तुमच्या डोक्यात हा प्रश्न नक्कीच आला असेल की, एवढे चित्रपट दाखवले जाणार आहेत, पण ते नेमके कुठे पाहायला मिळणार? यंदाच्या IFFI मध्ये गोव्यातील विविध ठिकाणी ६ प्रमुख Locationsवर १३ Indoor Screensवर चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये पणजी आणि पोर्वोरीममधील INOX, पणजीमधील Maquinez Palace, Z Square Samrat आणि Ashoka, मडगावमधील Ravindra Bhavan आणि फोंडामधील Magic Movies यांचा समावेश आहे. याशिवाय चित्रपटांचा अनुभव Theatreच्या चार भिंतींमध्येच मर्यादित न ठेवता, काही चित्रपटांचं Open Air Screening सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. Miramar Beach, Vagator Helipad आणि मडगावमधील याच सभागृहात खुल्या वातावरणात चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा खुल्या मैदानात सिनेमाचा अनुभव घेण्याची पर्वणी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे.

IFFI च्या निमित्ताने दरवर्षी आयोजित होणारा WAVES Film Bazaar सुद्धा यंदा महोत्सवाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, निर्मिती संस्था आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगातील प्रतिनिधींना एकत्र आणणारा हा मंच आहे. चित्रपटांच्या निर्मितीपासून ते वितरण, सहनिर्मिती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि नवीन प्रकल्पांसाठी संधी शोधण्यापर्यंत अनेक गोष्टी या मंचाच्या माध्यमातून घडतात. त्यामुळे नव्या Filmmakersसाठी हा एक महत्त्वाचा Platform ठरू शकतो. यासोबतच महोत्सवामध्ये विविध दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि सिनेमाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे Masterclasses आयोजित केले जाणार आहेत. चित्रपट कसा तयार होतो, त्यामागच्या कथा काय असतात, दिग्दर्शन, लेखन, अभिनय, Cinematography आणि Editingसारख्या प्रक्रियांचा अनुभव प्रत्यक्ष दिग्गजांकडून ऐकण्याची संधी या सत्रांमधून मिळणार आहे. त्यामुळे हा फक्त सिनेमाचा आनंद घेण्यापुरता महोत्सव नसून, सिनेमाकडे पाहण्याची दृष्टी विकसित करण्यासाठीसुद्धा एक मोठं व्यासपीठ आहे. (IFFI 2026)

=========================

हे देखील वाचा: IFFI 2026 : सिनेमाच्या पडद्यामागचं जग उलगडून सांगणारे मास्टरक्लासेस !

=========================

IFFI मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही चित्रपटसृष्टीतील व्यक्ती असण्याची गरज नाही. जर तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड असेल, जगभरातील सिनेमांचा अनुभव घ्यायचा असेल, वेगवेगळ्या भाषांतील कथा जाणून घ्यायच्या असतील, तर तुम्हीसुद्धा Delegate Registration करून या महोत्सवात सहभागी होऊ शकता. या नोंदणीच्या माध्यमातून सर्वसामान्य चित्रपटप्रेमींनाही महोत्सवात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी महोत्सवाच्या अधिकृत Websiteवर जाऊन नोंदणी करता येईल.

अधिकृत Website : https://www.iffigoa.org/

एकंदरीत, ज्यांना चित्रपटांची प्रचंड आवड आहे, ज्यांना जगभरातील सिनेमांचा अनुभव घ्यायचा आहे आणि ज्यांना चित्रपट हे केवळ मनोरंजन नसून एक कला, संस्कृती आणि विचारांचं माध्यम वाटतं, त्यांच्यासाठी IFFI म्हणजे खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. ९ दिवस, ८६ देश, शेकडो सिनेमे आणि सिनेमाच्या असंख्य कथा… यंदा गोवा पुन्हा एकदा सिनेमाच्या रंगात रंगणार आहे! त्यामुळे तुम्हीही चित्रपटप्रेमी असाल, तर या महोत्सवाची ही संधी नक्की अनुभवायला जा!

– सागर जाधव

THIS BLOG IS ORIGINALLY PUBLISHED ON KALAKRUTI MEDIA - https://kalakrutimedia.com/iffi-2026-the-festival-of-world-cinema-returns-to-goa/

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?