IFFI 2026 : फक्त ५० लाखांचं बजेट आणि कमावले तब्बल १२० कोटी !

 IFFI 2026 मध्ये त्याच चित्रपटांना स्थान मिळतं, जे थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. मी पाहिलेला Lalo – Krishna Sada Sahayate हा असाच एक चित्रपट! गुजराती चित्रपटसृष्टीतला हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरचा चमत्कार नाही, तर सुंदर स्टोरी-टेलिंगची ताकद काय असते, याचं उत्तम उदाहरण आहे. अवघ्या ५० लाखांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल १२० कोटींचा टप्पा ओलांडत व्यावसायिक यशाचा नवा इतिहास घडवला आणि आता ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात IFFI 2026 च्या इंडियन पॅनोरमा विभागात स्थान मिळवत या चित्रपटाने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. (IFFI 2026)

पण या चित्रपटाचं खरं यश आकड्यांमध्ये नाही, तर त्याने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या भावविश्वात आहे. एका रिक्षाचालकाची गोष्ट, पण संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडणारा आणि त्यातच त्याला मिळालेली मनुष्यरूपी देवाची साथ! आता थोडासा प्लॉट सांगतो. लालो म्हणजेच Shruhad Goswami हा आयुष्यातील गरिबी, कर्ज, व्यसन आणि स्वतःच्या चुकांमध्ये अडकलेला माणूस. त्याच्या आयुष्यात एक घटना घडते, ज्यामुळे तो एका रँडम फार्महाऊसमध्ये अडकतो. ती घटना काय असते यासाठी तुम्ही चित्रपट पाहिला पाहिजे. याच घटनेतून सुरू होतो त्याच्या आत्मशोधाचा प्रवास. या प्रवासात त्याला श्रीकृष्णाचं अस्तित्व जाणवतं आणि हळूहळू तो स्वतःच्या भूतकाळाला सामोरा जाऊ लागतो. चित्रपटाची कथा वरवर पाहता एका भक्ताची आणि त्याच्या देवाची वाटू शकते. मात्र, दिग्दर्शकाने या कथेला केवळ धार्मिक चौकटीत न ठेवता त्यातून अपराधीपणा, पश्चात्ताप, क्षमा आणि आत्मपरिवर्तन असे अनेक मानवी पैलू उलगडले आहेत. खास गोष्ट म्हणजे Ankit Sakhiya यांचं हे फीचर फिल्म डिरेक्शनमधलं डेब्यू आहे. (IFFI 2026)

सर्वात जास्त चित्रपटाची कथा ही त्या फार्महाऊसमध्ये घडलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष भव्य लोकेशन्स किंवा मोठ्या अॅक्शन सीक्वेन्सकडे न जाता पात्रांच्या मानसिक अवस्थेकडे केंद्रित राहतं. स्टोरी जसजशी पुढे जाते, तसतसे लालोच्या आयुष्यातील कित्येक गोष्टी उलगडत जातात. श्रीकृष्ण आणि लालो यांच्यातील संवाद, त्यातून समोर येणारे जीवनाचे अर्थ आणि भूतकाळातील घटनांचा वर्तमानाशी जोडलेला संदर्भ हे चित्रपटाला वेगळी उंची देतात. पण काही सीन्समध्ये स्क्रीनप्ले वेग मंदावतो. काही भावनिक आणि आध्यात्मिक सिन्समध्ये पुनरावृत्ती जाणवते. जी गरजेची नव्हती. त्यामुळे इंटरव्हलनंतर चित्रपट काही प्रेक्षकांना थोडा लांबलेला वाटू शकतो. तरीही डिरेक्टरने आपल्या मूळ विचाराशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. Shruhad Goswami यांनी लालोची भूमिका अत्यंत नैसर्गिक पद्धतीने साकारली आहे. आयुष्यातील चुकांचं ओझं वाहणारा, परिस्थितीसमोर हतबल झालेला आणि स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधणारा लालो त्यांच्या अभिनयातून जिवंत होतो. Karan Joshi यांनी साकारलेली व्यक्तिरेखाही कथेला महत्त्वाचा आधार देते. तर Reeva Rachh यांनी आपल्या भूमिकेतून भावनिक बाजू प्रभावीपणे मांडली आहे. इतर सहाय्यक कलाकारांनीही चित्रपटाच्या वास्तववादी वातावरणाला हातभार लावला आहे. या चित्रपटात मोठमोठे संवाद नाहीत तर चेहऱ्यावरचे भाव, शांतता आणि पात्रांच्या नजरेतून व्यक्त होणाऱ्या भावना अधिक परिणामकारक ठरतात. फार्महाऊससारख्या मर्यादित लोकेशनमध्ये संपूर्ण चित्रपटाचा मोठा भाग घडत असतानाही दृश्यांमध्ये एकसुरीपणा येऊ नये, याची काळजी घेतली आहे. क्लोजअप शॉट्स, लाइट्सचा वापर, पात्रांच्या चेहऱ्यांवर दिसणारे भाव आणि आजूबाजूच्या शांत वातावरणाचा केलेला वापर कथेला पूरक ठरतो. विशेष म्हणजे, श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची जाणीव करून देताना भव्य व्हिज्युअल इफेक्ट्सचा आधार घेण्याऐवजी प्रॉपर सीन्स आणि भावनांना प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे चित्रपटाचा आध्यात्मिक अनुभव अधिक सहज वाटतो. (IFFI 2026) (IFFI 2026)

म्युझिक या चित्रपटातली सर्वात जबरदस्त गोष्ट… Smit Jay यांचं म्युझिक आणि बॅकग्राउंड स्कोर चित्रपटाला आणखी खुलवतं. विशेष म्हणजे गुजराती लोकसंगीत आणि गरब्याच्या म्युझिकल प्रभावाचा वापर चित्रपटाच्या धार्मिक वातावरणाला आणखी समृद्ध करतो. यातले Manmohan, Dwarka No Nath, ही गाणी तुम्हाला निश्चितच आवडतील. (IFFI 2026)

चित्रपटाची सकारात्मक बाजू
-वेगळी आणि भावनिक आशय असलेली स्टोरी.
– Ankit Sakhiya यांचं प्रामाणिक दिग्दर्शन.
– मर्यादित लोकेशनचा (फार्महाउस) योग्य आणि कल्पक वापर.
– उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि म्युझिक.
– श्रद्धा, पश्चात्ताप आणि माणुसकी यांची सुंदर सांगड.

चित्रपटाची नकारात्मक बाजू
– काही ठिकाणी असलेलं स्लो स्क्रीनप्ले.
– काही सीन्समध्ये असलेला एकसुरीपणा.

मुळात हा चित्रपट केवळ पाहायचा नाही, तर अनुभवायचा आहे आणि Lalo – Krishna Sada Sahayate हा परिपूर्ण चित्रपट आहे, असं म्हणता येणार नाही. त्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही प्रसंग अधिक प्रभावीपणे मांडता आले असते. पण तरीही या चित्रपटाकडे दुर्लक्ष करता येत नाही. श्रीकृष्णाचं अस्तित्व इथे केवळ एका देवतेपुरतं मर्यादित राहत नाही. कधी ते मार्गदर्शक बनतं, कधी मित्र, तर कधी आपल्या आतल्या आवाजासारखं जाणवतं. आणि कदाचित म्हणूनच हा चित्रपट धार्मिकतेपलीकडे जाऊन माणुसकीशी संवाद साधतो. ५० लाखांच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट १२० कोटी कमावतो, हे निश्चितच आश्चर्यकारक आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, कोणताही मोठा सुपरस्टार नसताना, भव्य प्रोडक्शन हाऊस नसताना आणि प्रचंड प्रमोशन नसतानाही केवळ प्रेक्षकांच्या पसंतीच्या जोरावर चित्रपट एवढा मोठा प्रवास करतो. IFFI च्या इंडियन पॅनोरमा विभागात मिळालेलं स्थानही या चित्रपटाच्या प्रवासातील महत्त्वाचं पान आहे. (IFFI 2026)

=======================

हे देखील वाचा: IFFI 2026 : सिनेमाच्या पडद्यामागचं जग उलगडून सांगणारे मास्टरक्लासेस !

=======================

शेवटी, सिनेमा मोठा होण्यासाठी मोठं बजेट लागत नाही, मोठे स्टार्स लागत नाहीत. गरज असते ती एका प्रामाणिक कथेची, ती पडद्यावर जिवंत करणाऱ्या कलाकारांची आणि ती प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवणाऱ्या दिग्दर्शकाची! आणि Lalo हेच पुन्हा एकदा सिद्ध करतो. बरं हा रिलीज झाला होता, गेल्या वर्षी… पण प्रादेशिक सिनेमांमध्ये खास ठरला म्हणून त्या IFFI मध्ये स्थान मिळालं. त्यामुळे अनेक प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे आणि तुम्ही नक्कीच पाहू शकता. (IFFI 2026)

Kalakruti Media Lalo ला देत आहे ५ पैकी ४ स्टार्स.

Sagar Jadhav : IFFI GOA 2026 SPECIAL

THIS BLOG IS ORIGINALLY PUBLISHED AT KALAKRUTI MEDIA - https://kalakrutimedia.com/iffi-2026-a-budget-of-just-%e2%82%b950-lakh-and-a-whopping-%e2%82%b9120-crore-in-earnings/

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?