Mehmood : सिनेमाचा रंगमंच आणि मेहमूदच्या आयुष्यातील दोन बहिणींचे किस्से!
सिनेमाची दुनिया खूपच वेगळी आणि अतरंगी असते. इथे कुणाला कधी कोणती भूमिका करावी लागेल काही सांगता येत नाही. चित्रपटसृष्टीतील अनेक किस्से ऐकले की थक्क व्हायला होते. आता हेच पहा ना! बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीयन Mehmoodच्या आयुष्यात एक अजब प्रसंग घडला होता. एका चित्रपटात काम करताना त्याला कोणतीही हिरोईन मिळेना. त्यामुळे त्याला चक्क आपल्या सख्या बहिणीलाच आपली हिरोईन बनवावे लागले. इतकेच नाही तर तिच्यासोबत पडद्यावर एक रोमँटिक प्रेमगीतही सादर करावे लागले. याच मेहमूदच्या एका दुसऱ्या चित्रपटात एक नवीन हिरोईन होती. या सिनेमातही काही रोमँटिक सीन्स होते. पण मेहमूद काही केल्या त्या हिरोईनसोबत पडद्यावर कम्फर्टेबल होऊ शकला नाही. पुढे जाऊन मेहमूदने त्याच हिरोईनसोबत सख्या बहिणीसारखे पवित्र नाते निर्माण केले! हे दोन्ही प्रसंग कोणत्या सिनेमांच्या वेळी घडले होते? कोण होत्या त्या दोन अभिनेत्री? हा खरोखरच खूप इंटरेस्टिंग आणि भावस्पर्शी किस्सा आहे. (Mehmood)
पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात मेहमूद चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका करू लागला होता. चित्रपटात काम मिळणे हे त्याच्यासाठी खूप गरजेचे होते. कारण त्याच्यावर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी होती. आर्थिकदृष्ट्या तो काळ त्याच्यासाठी प्रचंड संघर्षाचा होता. याच काळात त्याला प्रसिद्ध दिग्दर्शक Shakti Samanta यांचा Howrah Bridge हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट १९५८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मेहमूदवर एक गाणे चित्रीत करायचे होते. पण त्याच्यासोबत काम करायला त्या काळात कोणतीही प्रस्थापित नायिका तयार नव्हती. मेहमूद तेव्हा फारसा प्रसिद्ध नव्हता. शेवटी कोणताही उपाय उरला नाही. मेहमूदने चक्क आपली सख्खी बहीण Meenu Mumtaz हिला या चित्रपटात आपली नायिका म्हणून घेतले. या दोघांवर चित्रीत झालेले एक गाणे त्या काळात खूप गाजले. गाण्याचे बोल होते, Gora Rang Chunariya Kali. संगीतकार O. P. Nayyar यांनी संगीतबद्ध केलेले हे पंजाबी ठेकयाचे भन्नाट गाणे होते. अर्थात, पडद्यावर सख्या भाऊ-बहिणीने रोमँटिक डान्स केल्यामुळे मेहमूदवर त्या काळात टीकाही झाली. पण या टीकेमागील खरी कहाणी वेगळीच होती. Hanif Zaveri यांनी मेहमूदवर Mehmood, a Man of Many Moods हे सुंदर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात मेहमूदने या घटनेची प्रांजळ कबुली दिली होती. निव्वळ गरिबी आणि मजबुरीमुळेच मी तो प्रकार केला होता, असे त्याने स्पष्ट सांगितले होते. (Mehmood)
या घटनेच्या पुढच्याच वर्षी मेहमूदचा आणखी एक चित्रपट आला. त्यात त्याची नायिका होती अभिनेत्री Nanda. चित्रपटाचे नाव होते Kaidi No. 911. हा चित्रपट १९५९ मध्ये आला होता. या चित्रपटात नंदासोबत त्याला एक रोमँटिक गीत सादर करायचे होते. गाण्याचे बोल होते, Pyar Bhari Hi Sadaye Geet Milan Ke Gaye. Manna Dey आणि Lata Mangeshkar यांनी हे सुंदर गाणे गायले होते. पण शूटिंगदरम्यान मेहमूद आणि नंदा यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री काही केल्या जुळत नव्हती. दोघांमध्ये एक प्रकारचा संकोच होता. पडद्यावर तो रोमान्स अजिबात नैसर्गिक वाटत नव्हता. शेवटी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण अनेकदा वाईट गोष्टीतून काहीतरी चांगले निष्पन्न होते. या सिनेमाच्या अपघातानंतर मेहमूद आणि नंदा यांच्यात एक अनोखे नाते निर्माण झाले. दोघांनी एकमेकांना भाऊ-बहीण मानले. याच वर्षी त्यांचा आणखी एक गाजलेला चित्रपट आला होता, Chhoti Bahen. या चित्रपटात मेहमूद आणि नंदा दोघेही होते. पण या सिनेमात मेहमूदची नायिका Shubha Khote होती. तर नंदाने त्याच्या बहिणीची भूमिका वठवली होती. या चित्रपटानंतर मेहमूद आणि नंदा यांचे एकत्र काही चित्रपट केले (Gumnaam, Woh Din Yaad Karo, Bedag..) पण दोघांमधील हे भावा-बहिणीचे नाते आयुष्यभर टिकून राहिले. (Mehmood)
======================
हे देखील वाचा: Comedian Mehmood : यांनी अभिनेता सुंदरजींना त्याच्या वृध्दापकाळी अनमोल मदत केली होती !
======================
पुढील काळात जेव्हा लेखक हनीफ जवेरी यांनी मेहमूदवर चरित्र लिहिले, तेव्हा एक प्रश्न समोर आला. या पुस्तकाची प्रस्तावना कोणी लिहावी? असा विचार सुरू होता. त्यावेळी मेहमूदने क्षणाचाही विलंब न करता सांगितले, माझ्या पुस्तकाची प्रस्तावना माझी बहीण नंदाच लिहिणार! नंदानेही मेहमूदचा हा हट्ट हसतमुखाने मान्य केला. तिने अत्यंत आत्मीयतेने त्या पुस्तकाची सुंदर प्रस्तावना लिहिली. म्हणजे बघा, काय हा योगायोग! एका सिनेमात मेहमूदने स्वतःच्या सख्या बहिणीला नायिका बनवले, ही त्याची मजबुरी होती. पण दुसऱ्या एका सिनेमातील नायिकेला त्याने आयुष्यभरासाठी बहिणीचा दर्जा दिला. पडद्यावरील कृत्रिम जगाला ‘कचकड्याची दुनिया’ म्हणतात. इथे नात्यांना आणि भावनांना काही किंमत नसते, असा सार्वत्रिक समज आहे. पण मेहमूद आणि Nanda यांचे हे उदाहरण पाहिले की तो समज किती चुकीचा आहे हे लक्षात येते. आज मेहमूद आपल्यात नाही आणि नंदासुद्धा या जगात नाही. पण कचकड्याच्या या दुनियेत त्यांनी जपलेल्या या अकृत्रिम आणि निस्वार्थ प्रेमाला तुम्ही काय नाव द्याल? (Mehmood)
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी
THIS BLOG IS ORIGINALLY PUBLISHED ON KALAKRUTI MEDIA - https://kalakrutimedia.com/mehmood-the-world-of-cinema-and-anecdotes-about-the-two-sisters-in-mehmoods-life/


Comments
Post a Comment